Pune : मिर्झा गालिब हे काळाच्या पुढचे शायर !- डॉ.सईद तकी अबिदी

एमपीसी न्यूज- गालिब प्रतिभावान शायर होते, पण, त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही. अजूनही त्यांचे शेकडो शेरमधील भावना आपण समजून घेण्यास अपुरे पडतो. त्यांच्या शायरीवर अजून संशोधन व्हायला हवे अशी भावना आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ.सईद तकी अबिदी यांनी व्यक्त केली. ‘हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’,रसिक मित्र मंडळ आणि ‘इना फौंडेशन’ या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गालिब का अंदाज-ए-बयान’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मिर्झा गालिब यांची 222 वी जयंती 27 डिसेंबर रोजी आहे. त्या निमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

‘नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लेन्ग्वेज‘ चे सदस्य डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आबेदा इनामदार,’इना फौंडेशन’चे अध्यक्ष झुबेर शेख, मुनव्वर पिरभॉय , मुमताज पिरभॉय उपस्थित होते.

डॉ. आबिदी म्हणाले, ‘मिर्झा गालिब यांनी दीड हजार उर्दू शेर लिहिले, फारसी शेर 13 हजाराहून जास्त लिहिले आहेत. त्यांच्या फारशी शेरो- शायरीवर अधिक संशोधन व्हायला हवे.मिर्झा गालिब सारखा शायर झाला नाही. दैव दुर्लभ अशी शब्दांची दुनिया त्यांनी उभी केली. देवदूत,फरिश्ते सुध्दा मानवी जीवनातील मौज, हळूवार भावना समजू शकणार नाहीत, असे सांगून ते शायरीतून हळूवारपणे ही मौज, भावना पुढे आणत होते.

खूप कमी मानधनात नोकरी करताना त्यांची घालमेल होत असे. पण, त्यांच्या विपरीत परिस्थितीत मदत करायला कोणी तयार नव्हते. गालिब प्रतिभावान शायर होते, पण, त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही. तो काळ इतक्या महान प्रतिभेला समजून घेण्यास सज्ज नव्हता. अजूनही त्यांचे शेकडो शेरमधील भावना आपण समजून घेण्यास अपुरे पडतो. काळाच्या पुढचे शब्द लिहिताना ते समकालीन मंडळींना दुखावत नव्हते. त्यांच्या शायरीवर अजून संशोधन व्हायला हवे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,’ यशस्वी हृदयरोग तज्ज्ञ असताना देखील डॉ अबिदी यांनी ऊर्दू भाषा,कवी यांचा जो अभ्यास केला, त्याची तोड नाही. आमच्या कॅम्पस मधील उर्दू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या अभ्यासाची मदत होईल. डॉ.आबिदी यांच्या लेखनावर पी.एच.डी. करण्यास आम्ही प्रोत्साहन देऊ. ‘

यावेळी उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्यावर डॉ.आबिदी लिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा, उजमा तस्निम यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.