Misbehave of PMPML Conductor : पीएमपीएमएलच्या कंडक्टरची आरेरावी, प्रवासी तरुणीचे ओढले केस

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल (Misbehave of PMPML Conductor) बसच्या एका कंडक्टरच्या उद्धट वर्तवणुकीबद्दल वरिष्ठाकडे तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या प्रवासी तरुणीला धक्काबुक्की करीत तिचे केस ओढून बसमधून खाली उतरविण्याचा संतापजनक प्रकार आज (मंगळवारी) सकाळी तळेगाव दाभाडे येथे घडला.
या प्रकरणी पीडित तरुणीने पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक चेतना केरूर तसेच जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांच्याकडे तक्रार करून संबंधित वाहकाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित 22 वर्षीय तरुणी ऑफिसला जाण्यासाठी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी तळेगाव स्टेशन चौकातील बस थांब्यावर वडगाव-कात्रज बसमध्ये चढली. मागच्या दारात व पुढच्या बाजूस प्रवाशांची गर्दी होती. बसच्या मधल्या भागात उभे राहण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा होती. तिकडे जाण्यासाठी त्यांनी कंटक्टरला थोडे सरकून जागा देण्याची विनंती केली. त्यावर ‘मी काय आता खाली उतरू का’, असे उद्धट उत्तर कंडक्टरने दिले. त्या तरुणीने त्यांना नीट बोलण्यास सांगूनही तो कंडक्टर हुज्जत घालत बसला. ‘तुला त्रास होत असेल तर बस थांबवतो. खाली उतर’ असेही त्याने धमकावले.

या उद्धट वर्तणुकीबाबत वरिष्ठांकडे तक्रार करीन, असे सूचित करून त्या तरुणीने कंडक्टरचा फोटो काढला असता तो आणखीच भडकला. बस थांबावयला लावून त्या तरुणीच्या पाठीवरील बॅग ओढत धक्काबुक्की केली. त्यात तिचे केसही ओढले गेले व असह्य वेदना झाल्या. हा सर्व प्रकार घडत असताना बसमधील अन्य प्रवाशांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. अपमानास्पद पद्धतीने तरुणीला बसमधून उतरवून (Misbehave of PMPML Conductor) बस पुढे निघून गेली.
संबंधित वाहक हा अन्य प्रवाशांशी देखील त्याच पद्धतीने बोलत होता. बस चालकाबद्दलही त्याने सर्वांसमक्ष अपशब्द वापरले. प्रवाशांना कामाला जाण्याची घाई असल्यामुळे ते वाहकाच्या बोलण्या-वागण्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, नागरिकांच्या पैशातून पगार घेत असलेल्या या लोकसेवकाने प्रवाशांशी अशा पद्धतीची आरेरावीची उद्धट वर्तणूक करणे, हे अत्यंत चुकीचे असून त्यामुळे पीएमपीएमएलची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे पीएमपीएमएलने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंडक्टरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तरुणीने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.