Pune : पोलीस कर्मचा-याशी गैरवर्तन; गणेशमंडळातील तिघांना अटक

एमपीसी न्यूज – गणपती मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-याशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल (दि.14) रात्री बाराच्या सुमारास घडली. महानगरपालिका व्हेईकल डेपोजवळील श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाच्या कर्मचा-यांवर काल शुक्रवारी (दि.14) ही कारवाई करण्यात आली. 

याप्रकरणी पोलीस शिपाई डी.डी. रणसिंग यांनी फिर्याद दिली आहे. बबलू लालसाहब पितळे (वय 33, रा. कात्रज) परशुराम बसप्पा होसमनी (वय 37, रा. गुलटेकडी) व राहुल रेवन आप्पा ढोण (वय 19, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी काल बीट मार्शल ड्युटी करताना श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ येथे मंडळ चेक करण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथील मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पोलीस कर्मचा-याशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याने मंडळातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.