Bhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत

एमपीसी न्यूज – घराबाहेर अंगणात खेळता खेळता रस्त्यावर आली अन रस्त्याने चालता-चालता घरचा रस्ता विसरलेली साडेचार वर्षाची चिमुकली सात तासानंतर आईच्या कुशीत सुखरूप विसावली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुमारास भोसरी येथे घडली. गुन्हे शाखा आणि भोसरी पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.

आलिया खान (वय साडेचार वर्ष) असे हरवून सापडलेल्या चिमुरडीचा नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील मोहम्मद हैदर खान (वय 38, रा. भोसरी. मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी पोलिसांना माहिती दिली.

दुपारी तीनच्या सुमारास आलिया घरात मोबाईलवर खेळत बसली होती. तिच्या आईने तिच्याकडून मोबाईल काढून घेतला. त्यामुळे ती खेळण्यासाठी अंगणात आली. अंगणात खेळता खेळता ती रस्त्यावर आली आणि रस्त्यावर चालू लागली. काही वेळ गेल्यानंतर ती घराकडे जाणारा रस्ताच विसरली. बराच वेळ झाला तरी आलिया घरी आली नाही. दुपारी तिच्याकडून मोबाईल काढून घेतल्यामुळे ती कदाचित रागावली असेल आणि बाहेर खेळत असेल असा समज झाल्याने तिच्या आईने तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण आणखी काही वेळ गेल्यानंतर आलिया अंगणातही दिसत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी अंगणासह परिसरात शोध घेतला. ती सापडली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी तात्काळ भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

भोसरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत गुन्हे शाखेला कळविले. गुन्हे शाखा आणि भोसरी पोलीस अशा एकूण 40 पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्या. या पथकांनी तात्काळ तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांकडे चौकशी केली जात होती. शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या अपहरण आणि गुन्हेगारी घटनांमुळे खान कुटुंबीय पुरते हादरून गेले. एका पथकाला आलिया एका सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेली दिसली. त्यामध्ये ती रस्त्याने एकटीच चालत जात होती. भोसरी मधील भगवती वस्तीला लागून असलेल्या एमआयडीसी परिसराकडे आलिया गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात पथकांना रवाना केले. त्याच परिसरात आलिया एका रस्त्याच्या बाजूला झोपलेली आढळून आली. लगेच खान कुटुंबियांना आलिया सोपविण्यात आली. अवघ्या सात तासाच्या आत ही शोधमोहीम फत्ते झाली. आलिया तिच्या आईच्या कुशीत जाताच खान कुटूंबियांसह पोलिसांनी देखील निःश्वास टाकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.