Mission Begin Again : आता मॉल, मैदानावरील खेळाला परवानगी

एमपीसी न्यूज – ‘मिशन बिगन अगेन’ करीत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरातील मॉल, मैदानावरील खेळाला येत्या 5 ऑगस्ट पासून महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल, शाळा, कॉलेज, स्विमिंग पूल आणि जिम बंदच राहणार आहेत.

टॅक्सी आणि कॅब चालका सोबत 3 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवर आता 2 व्यक्तींना प्रवास करता येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी (दि. 31 जुलै) रात्री उशिरा काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

या आदेशानुसार जुलै महिन्यात जी स्थिती होती, तशीच कायम ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सोडून इतर दुकानदारांनाही P1 आणि P2 पध्दतीने परवानगी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी आठवड्यातून 5 दिवस दुकाने सुरू आणि 2 दिवस बंद ठेवण्याची मागणी केली होती. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष अधिकारी सौरभ राव यांच्याशी व्यापाऱ्यांची चर्चाही झाली होती. मात्र, व्यापाऱ्यांमधेच या विषयावरून फूट पडली होती. त्यानंतर ही मागणी मागे पडली.

मॉल आणि मार्केट येत्या 5 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरू राहणार आहेत. खुल्या मैदानावर टीमवाले खेळ सोडून गोल्फ, निषानेबाजी, टेनिस, मल्लखांब, जिमनेस्टिकला परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवे सोबतच इतर वस्तूंच्या दुकानदारांना, वाइन शॉपला यापूर्वी परवानगी दिली असल्यास सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी करता येणार आहे.

सरकारी कार्यालयात 15 टक्के कर्मचारी उपस्थिती, खाजगी कार्यालयात 10 टक्के कर्मचारी, आयटी कार्यालयात 50 टक्के कर्मचारी, सलून, स्पा, पार्लरला नियमांचे पालन करून 13 जुलैच्या आदेशानुसार सुरू करता येणार आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.