Mission Begin Again : पुनश्च हरी ॐ! ‘लॉकडाऊन’ शब्दाला आता कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याची वेळ – मुख्यमंत्री

Mission Begin Again: Punacch Hari OM ! It's time to dump the word 'lockdown' - CM

एमपीसी न्यूज – ‘लॉकडाऊन’ या शब्दाला आता कचऱ्याच्या टोपलीत टाकून, ‘पुनश्च हरी ॐ’ करण्याची वेळ आली आहे. आपण आता नव्या आयुष्याची सुरुवात करत आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना केले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, घरातून बाहेर पडताना मास्क लावा, हात वारंवार धुवा आणि चेहऱ्यावरून हात फिरवू नका. आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकायचं आहे. 3  जूनपासून आपण पुन्हा हात-पाय हलवायला सुरुवात करुया, असं मुख्यमंत्री म्हणाले. पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा धोका आहे, यासाठी यंत्रणा सज्ज आहे, पण मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

8 जूनपासून आपण 10 टक्के उपस्थितीने आपण कार्यालयं आणि मंत्रालय सुरू करणार आहोत. 10 टक्के उपस्थितीमध्ये काय परिस्थिती निर्माण होतेय, ते पाहून ही उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, राष्ट्रपती राजवट लावा आणि लष्कराला बोलवा म्हणणाऱ्यांना आकडेवारी दाखवा, कारण 65 हजारातले 28 हजार रुग्ण घरी गेले, बहुतेक जणांचा कोरोना मध्यम स्वरुपाचा आहे. तर व्हॅन्टिलेटरवर असेलेले काही रुग्णही बरे झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान काही आपलीच लोकं करत आहेत, त्यामुळे दु:ख होतं. महाराष्ट्रात भयावह स्थिती नाही. दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केली.

CM Uddhav Thackeray : ऐका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून केलेले पूर्ण भाषण 

वृत्तपत्र वितरण आणि वॉकला परवानगी

वृत्तपत्रांचं वितरण पुढच्या सोमवारपासून प्रत्येकाच्या घरी होणार आहे, तसंच सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना माॅर्निंग व इव्हिनिंग वॉक करता येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. वॉकला जाताना आपण आरोग्य कमावण्यासाठी जातोय, त्यामुळे गर्दी करू नका आणि नियम पाळा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

घरातील वृद्ध आणि लहानग्यांची काळजी घ्या

गरज नसताना घराबाहेर पडू नका. मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी आणि वृद्धांनी घराबाहेर पडू नये. बाहेरून येणाऱ्यांनी घरातल्या वृद्धांना अनावधानानंही आपण कोरोना तर देत नाही ना, याची काळजी घ्यायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर घरातल्या वृद्धांजवळ जाताना स्वच्छ होऊन जा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय

शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागासोबत बैठक घेण्यात आली. तसेच कुलगुरूंच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेता सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण देऊन मार्क्स द्यायचे आहेत. आणि त्यांना पास करायचे आहे. त्यांना थांबवायचं नाही. शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरीकाढून गुण द्यायचे आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की, आपण यापेक्षा अधिक मार्क कमवू शकत होतो. त्या विद्यार्थ्यांना योग्य ती वेळ पाहून पुन्हा परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत.

मिशन बिगिन अगेन (पुनश्चः प्रारंभ) 

पुनश्चः प्रारंभ या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात केली जाईल. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्शा, ऑटो, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरु राहतील. हा आदेश 1 जून पासून अंमलात येत असून तो 30 जून 2020 पर्यंत लागू राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like