Bhosari News : गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये “मिशन शून्य कचरा”;’ क’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘पुढचे पाऊल’,  कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग

एमपीसी न्यूज – उघड्यावर इतस्तत: पडणारा कचरा,या कचऱ्याभोवती पसरलेली दुर्गंधी, भटकी जनावरे असे चित्र. मात्र हे चित्र बदलण्याचा विडा  महापालिका प्रशासनाने स्वछाग्रह मोहिमेच्या माध्यमातून उचलला.सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी क क्षेत्रिय कार्यालयांचे हद्दीत शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रम सुरू करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून नियोजन केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून वस्तीतील सार्वजनिक शौचालय साफसफाई प्रकल्प नवी दिशाचे माध्यमातून सुरू केल्यानंतर या प्रकल्प निर्मितीचे कामाला चालना मिळाली.त्याच अंतर्गत गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येणार आहे.या झोपडपट्टीमधील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग सुरू करण्यात येणार आहे.या झोपडपट्टीमधील ओला कचरा नेहरूनगर येथील गुलाब पुष्प उद्यानात आणला जाणार आहे त्यातून खत निर्मिती करण्यासाठीची तयारी महापालिकेने केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंर्तगत स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 -23 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहभागी झालेली आहे. या अंतर्गत शहरातील कचऱ्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये झोपडपट्टीमधील कचरा बाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्यातीलच एक टप्पा म्हणजे मिशन झिरो वेस्टेज असल्याचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले. यासाठी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचे मार्गदर्शन आहे

सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांचे मार्गदर्शनाखाली क क्षेत्रीय कार्यालय परिसरातील नागरिकांना डिवाईन संस्थेमार्फत कचरा अलगीकरण बाबत जनजागृती, प्रबोधन केले जात आहे. सध्या या झोपडपट्टीमधील  ओला व सुका कचरा वर्गीकरण करून बीव्हीजी या संस्थेच्या वाहनांद्वारे उचलुन मोशी कचरा डेपोपर्यंत नेला जातो. यामध्ये वाहतूक खर्चा सोबतच वेळेचा देखील अपव्यय होत आहे. त्यामुळे मिशन झिरो वेस्टेज येथे राबवण्यात येणार आहे.

काय आहे मिशन झिरो वेस्टेज
मिशन झिरो वेस्टेज या उपक्रमाअंतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाने गवळीमाथा झोपडपट्टीची (प्रभाग क्र. 08) शुन्य कचरा झोपडपट्टी म्हणून निवड केली आहे. त्या अंतर्गत झोपडपट्टीत निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट त्याच परिसरात लावण्यात येणार आहे.

रोज 637 किलो कचऱ्याची निर्मिती

गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये 1574 लोकसंख्या असून 398 कुटुंबसंख्या आहे.या झोपडपट्टीमध्ये दैनंदिन ओला कचरा 358 किलो आणि सुका कचरा 279 किलो असे एकूण अंदाजे 637 किलो दैनंदिन कचरा निर्माण होत असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे सहाय्यक आयुक्त बोदडे यांनी सांगितले.या झोपडपट्टीमध्ये निर्माण होणारा ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ओला कच-यापासून खत निर्मिती करणार आहे.

अशी होईल खत निर्मिती
गवळीमाथा झोपडपट्टीमधून रोज 637 किलो कचरा गुलाब पुष्प उद्यानात आणला जाणार आहे. या उद्यानामध्ये खत निर्मितीसाठी तीन ‘पीट’ तयार करण्यात आले आहेत.यामध्ये रोजचा कचरा ‘डंप’ करण्यात येईल.त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्यापासून खत निर्मिती होणार आहे.यामध्ये महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये महिला बचत गटांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे.या महिला कचऱ्याची वर्गवारी करण्यापासून ते पीटपर्यंत कचरा आणण्यापर्यंतचे नियोजन करणार आहेत.याशिवाय या कचऱ्यापासून तयार झालेले खत विविध महापालिकेच्या उद्यानांपर्यंत पोहोचवायचे काम देखील या बचत गटांच्या माध्यमातूनच केले जाणार आहे. तसेच सुक्या कच-याचे पुर्नवापर करण्यात येणार आहे.

शून्य कचरा म्हणजे  ज्या परिसरात कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी अथवा परिसरामध्ये त्याची विल्हेवाट लावणे होय. अशी ही संकल्पना आहे यासाठी गवळी माथा झोपडपट्टीची प्रायोगिक तत्त्वावर निवड झाली आहे. अशा प्रकारचा हा शहरात प्रथमच केलेला अभिनव प्रयोग आहे. यामध्ये महिला बचत गट,नागरिक यांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जाणार आहे. यातून जिथे कचरा निर्माण होतो तिथेच जिरवण्याची संकल्पना पुढे येईल.

 

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांचे विशेष मार्गदर्शन  या प्रकल्प उभारणीसाठी लाभत आहे. क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते,राजेंद्र उज्जिनवाल,आरोग्य निरीक्षक क्षितिज रोकडे हे हा प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करीत आहेत.

येत्या 16 ऑगस्ट 2023  रोजी आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र पाटील,उल्हास जगताप,उपायुक्त अजय चारठाणकर यांचे विशेष उपस्थितीत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.