Pimpri : गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी आमदार लक्ष्मण जगतापांची केंद्राकडे धाव

पीएमजेएवाय योजनेत शहरातील रुग्णालयांना त्वरित परवानगीची मागणी

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अनेक मोठ्या खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली आहे. परंतु, या रुग्णालयांना ही योजना राबविण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. परिणामी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेलेल्या पात्र रुग्णांना खासगी रुग्णालये उपचार नाकारत असून, रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी नोंदणी केलेल्या पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर उपचारासाठी परवानगी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब रुग्णांना महागडे उपचार मोफत मिळावेत यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महागडे उपचार सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येतात. त्यामुळे ही योजना देशभरातील गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य संजीवनी ठरली आहे. या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी संबंधित रुग्णांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीनंतर रुग्णांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे स्मार्ट कार्ड मिळते. त्यानंतर संबंधित रुग्ण या योजनेअंतर्गतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरतो.

पिंपरी-चिंचवडमधील हजारो रुग्णांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करून स्मार्ट कार्ड मिळविलेले आहे. एकट्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सुमारे १२ हजारहून अधिक कुटुंबांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे. परंतु, योजनेचे नोंदणी स्मार्ट कार्ड घेऊन उपचारासाठी गेल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालये रुग्णांना उपचार नाकारत आहेत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी रुग्णालयाने नोंदणी केली असली, तरी केंद्र सरकारने उपचारांसाठी अद्याप परवानगी दिली नसल्याचे कारण रुग्णांना सांगितले जात आहे. या सर्व बाबींची माहिती घेतली असता शहरातील रुग्णालयांनी केंद्र सरकारकडे नोंदणी केलेली असून, त्यांना उपचाराची परवानगी प्रमाणपत्र दिले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच हे परवानगी प्रमाणपत्र घेण्यासाठी शहरातील रुग्णालयांनीही फारसा पाठपुरावा केला नसल्याचेही निदर्शनास येत आहे.

त्यामुळे शहरातील शेकडो गोरगरीब रुग्ण आपल्याला झालेल्या मोठ्या आजारांवर उपचारांपासून वंचित राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोगी भारताचे स्वप्न पाहिलेले आहे. त्यासाठी गोरगरीब रुग्णांनाही चांगले उपचार मिळणे आवश्यक आहेत. या गोरगरीब रुग्णांना डोळ्यांसमोर ठेवूनच पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आहे. परंतु, प्रशासकीय पातळीवर या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळून येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या शहरातील खासगी रुग्णालयांना त्वरित उपचार परवानगी प्रमाणपत्रे देण्यात यावीत. त्यामुळे शहरातील रुग्णांवर या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतील आणि त्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.