Pimpri : अतिक्रमणांचा विषय गंभीर; ठोस भूमिकेसाठी खासदार बारणेंनी पुढाकार घ्यावा – लक्ष्मण जगताप 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा विषय निश्चितच गंभीर आहे. त्याबाबत प्रशासन आपल्या स्तरावर वेळोवेळी दखल घेत असते. कारवाईही केली जाते. तरीही, अतिक्रमणांबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेत पुढे यावे, असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले आहे.  

खासदार बारणे यांनी गुरूवारी शहरातील अतिक्रमण आणि त्यांच्याकडून हफ्ते वसूली करणारे तसेच सत्ताधा-यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला आज (शुक्रवारी) लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अतिक्रमणांबाबत काय धोरण असावे आणि कशी कारवाई व्हावी, हे बारणे यांनी सांगावे. त्यानुसार थेरगाव भागापासूनच अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासन ठोस कारवाईला सुरूवात करेल. नंतर ते शहराच्या प्रत्येक भागात राबवण्यात येईल. त्यामुळे बारणे यांनी आता यासाठी पुढाकार घ्यावा.

थेरगाव परिसराचा बकालपणा कोणी वाढविला आणि तेथील हप्तेवसुली कोण करत आहे?, याचे उत्तर आधी बारणे यांनी द्यावे. या भागातील केवळ डांगे चौकाचा विचार केल्यास अनधिकृत टप-या, हातगाड्या आणि रस्त्यावरच भरणारा बाजार यामुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी होते. हे सर्व पाहिल्यास बारणे यांचे शहर नियोजनाबाबतचे किती दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधीत्व आहे, हे सिद्ध होते.

थेरगावच्या अन्य भागात डांगे चौकापेक्षाही भयानक अवस्था आहे. हे तेथील लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्याचा त्रासही तेथील जनतेला सोसावा लागत आहे. त्यामुळे शहर नियोजनाची दूरदृष्टी असलेल्या खासदार बारणे यांना ते स्वतः राहत असलेल्या परिसराचे सुनियोजन करण्यासाठी कोणीही रोखले नव्हते. परंतु, आपल्याच भागातील जनतेला होणारा त्रास खासदार बारणे यांना दिसत नाही, असेही जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.