Rajya Sabha Election 2022 : आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी ॲम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना; आजारपणात बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha Election 2022) आज (दि. 10 जून) मतदान होणार आहे. सहा जागांपैकी एका जागेवर चुरस होणार हे निश्चत असले तरीही त्यावर कोणता पक्ष शिक्कामोर्तब करणार यावर सध्या उलटसूलट चर्चा सुरू आहेत. मतदानाच्या वेळी आपले संख्याबळ कमी पडू नये याबाबत सगळ्याच पक्षांतर्गत काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान पिंपरी – चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आमदार जगताप आजारी असले तरीही आज ते मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरु झाली आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

पिंपरी – चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप सुद्धा सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले आहेत. आमदार जगताप गेल्या दोन महिन्यांपासून आजारपणामुळे त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांना 2 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आल्या. आजारपणात काळजी म्हणून सक्तीचा आराम करण्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले होते. अशा परिस्थितीत जगताप यांनी मतदानासाठी (Rajya Sabha Election 2022) मुंबईत जावे का या विचाराने कुटुंब संभ्रमात, काळजीत पडले होते, किंबहुना ते जगताप यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते, परंतु पक्षाच्या आग्रहामुळे त्यांच्या मुंबईवारीला कुटुंबीयांकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

Pune MHADA : पुणे म्हाडाच्या पाच हजार सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

दरम्यान, लक्ष्मण जगताप मुंबईला रवाना झाल्याचे सांगत त्यांचे बंधू शंकर जगताप म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला प्रकृती ठीक असेल तरच या, असे सांगितले होते. आम्ही लक्ष्मणभाऊ यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधत पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो, असं सांगितलं. तसंच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हवामान बदलामुळे डॉक्टरांनी एअर ॲम्बुलन्सचा पर्याय नाकारला. कार्डियक  अँब्युलन्समधून  भाऊ मुंबईला रवाना झाले आहेत, अशी माहिती आमदार जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी दिली.

रस्तेमार्ग प्रवास करणे सुरक्षित वाटत नसल्यास आमदार जगताप यांना एअर लिफ्ट करून मुंबईत नेले जाईल. राज्यसभा निवडणुकीचे मतदान करून लक्ष्मण जगताप पुन्हा पिंपरी – चिंचवडकडे परततील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.