Pimpri : आमदार महेश लांडगे यांचा विदर्भ-खान्देशवासीयांचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – विदर्भ आणि खान्देश भागातून भोसरी परिसरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्नेहमेळावा च-होली येथे उत्साहात पार पडला. केदारेश्वर प्रतिष्ठान आणि विदर्भ मित्र मंडळ यांच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला. विदर्भ आणि खान्देश भागातील भोसरी वासियांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुन्हा एकदा महेश लांडगे यांना आमदार म्हणून नेतृत्व आणि काम करण्याची संधी देण्याचा संकल्प केला.

भोसरी येथे झालेल्या या मेळाव्यासाठी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, कविता भोंगाळे, प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रशांत पाटील, अक्षय चौधरी, विजय फुगे आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक कामानिमित्त आले आहेत. मागील वेळी मी आपल्याकडे अपक्ष म्हणून आलो, तेंव्हा आपण मला काम करण्याची संधी दिली. यावेळी मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आपल्याकडे येणार आहे. यावेळी देखील आपण मला काम करण्याची संधी द्याल, ही अपेक्षा आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले आहे. या शहराच्या विकासासाठी आपल्या सर्वांची मदत हवी आहे, ती मदत या निवडणुकीत आपण करावी, असेही आमदार लांडगे म्हणाले.

महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या सर्वांची जन्मभूमी वेगवेगळी असली तरी कर्मभूमी एकच आहे. या भूमीला धार्मिक आणि अध्यात्मिक वारसा लाभला आहे. संतांची भूमी म्हणून या भूमीला ओळखले जाते. अशी पावन नागरी आपली कर्मभूमी आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असताना संसाधनांची कमतरता भासत नाही. हे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. या सर्वांगीण विकासासाठी आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आपण निवडून द्यावे, असेही महापौर जाधव म्हणाले.

कविता भोंगाळे म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहराला वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांनी वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. राज्याच्या विविध भागातून आलेले सर्व नागरिक आपली कर्मभूमी म्हणून या नगरीत काम करत आहेत. आमदार महेश लांडगे यांनी आजवर सातत्याने आपल्या विविध प्रश्नांसाठी लढा दिला आहे. हा लढा या नगरीतला विदर्भ आणि खान्देशवासी कधीही विसरणार नाही. भोसरी आणि परिसरातील विदर्भ आणि खान्देशमधील प्रत्येक नागरिक यापुढे देखील आमदार महेश लांडगे यांच्या सोबत कायम उभा राहणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.