Pimpri News : महापालिका सेवानिवृत्त कर्मचा-यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात महापालिका कर्मचा-यांचे मोलाचे योगदान आहे. कर्मचा-यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरात अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. मात्र, कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांना वैद्यकीय सेवा मोफत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या सेवा निवृत्त कर्मचा-यांना धन्वंतरी आरोग्य योजना आणि विमा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू केली होती. त्यासाठी धोरणही तयार केले होते. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते.

कुटुंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्ती यामध्ये उपचार घेऊ शकत होते. धन्वतंरी योजनेमध्ये सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांकडून 300 रुपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांनाकडून 150 रुपये स्वहिस्सा जमा केला जात होता. जमा होणा-या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम पालिका धन्वंतरी निधीत जमा करत होती.

धन्वतंरी योजनेतर्गत खासगी रुग्णालयांसमवेत करारनामा केला होता. मात्र, ही योजना बंद करून कर्मचा-यांसाठी वैद्यकीय विमा योजना सुरू करण्यात आली. यामध्ये सेवा निवृत्त कर्मचा-यांना स्थान देण्यात आले नव्हते. सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांना महापालिकेच्या वतीने उतार वयात त्यांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी आरोग्य योजना अथवा विमा योजना सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.