Pimpri News: रुपी बँकेच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने घोषणा केलेल्या सुधारित ठेव वीमा कायदाचा फायदा झाल्याने पुण्यातील रुपी को-ऑप बँकेच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. 5 लाखांपुढील ठेवीदारांना कशाप्रकारे दिलासा देता येईल, असा प्रश्न आहे. त्यामुळे रुपीच्या ठेवीदारांचा लढा अद्याप संपलेला नाही, असेही ते म्हणाले.

महेश लांडगे म्हणाले की, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सहकार्याने आम्ही रुपी बँकेच्या ठेवीदारांना राज्य सरकारच्या सहकार विभागाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आम्ही केली होती. याबाबत विधानसभा अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रुपी को-आपरेटिव्‍ही बॅकेचे शेकडो खातेदार व ठेवीदार आहेत. त्यामाध्यमातून सुमारे 1 हजार 297 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. पाच लाखांपर्यंत ठेवीदारांची संख्या तब्बल 4 लाख 96 हजार इतकी आहे.

तसेच, पाच लाखांपर्यंत सुमारे 965 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादण्यात आलेल्या बँकांच्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी सुधारित ठेव विमा कायदा पारित केला आहे. त्यानुसार रुपी बँकेच्या 4 लाख 96 हजार ठेवीदारांना त्याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, ठेव विमा महामंडळामार्फत (डीआयसीजीसी) ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सुमारे 1400 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत ठेवल्या आहेत. मात्र, बँकेतील संचालकांच्या अनागोंदीमुळे बँक बुडीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सहकार विभागाने ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार
रुपीच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळवण्यासाठी बँकेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी संबंधित शाखेत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ठेवीदारांना या अर्जासोबत रहिवाशी पुरावा, दोन छायाचित्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड दोन प्रतींमध्ये देणे आवश्यक आहे. बँकेने केवायसीसह अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे संबंधित ठेवीदारांनी तात्काळ बँकेच्या शाखांमध्ये पाठपुरावा करावा, असे आवाहनही आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.