Maval News: तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आमदार शेळके यांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट 

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांनी काल (मंगळवारी) मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मावळ तालुक्यातील पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली.

 
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणारे गड किल्ले, प्राचीन बौध्दकालीन लेण्या, तीर्थक्षेत्रे, धरणे, घनदाट हिरवीगार वृक्षराजी, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे यामुळे मावळात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि याच माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार निर्माण होत असल्याने पर्यटनक्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. याच संदर्भात आमदार शेळके यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
 
मावळातील किल्ले लोहगड-विसापूर ते एकविरा पायथा या रस्त्याचे काम सुरू व्हावे. तसेच एकवीरा देवी मंदिर परिसर पर्यटकांना प्रसन्न वाटेल, अशा प्रकारे सुशोभित करणे गरजेचे आहे. या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार शेळके यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. यावेळी ही कामे लवकरच सुरु करण्यात येतील, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.
  
कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद होती. लॉकडाऊन, कोरोना यामुळे पर्यटन क्षेत्रालाही चांगलाच फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पर्यटना सारख्या उद्योगाचे नुकसान या संकटामुळे झाले आहे. प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मागील काही दिवसांपासून ही पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर देता येईल, असे शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.