Talegaon Dabhade : आमदार शेळके यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी 9 जानेवारीला पोटनिवडणूक

एमपीसी न्यूज – आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग  क्र. सात ब या जागेसाठी नऊ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेळके या दोघांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 
राज्य निवडणूक आयोगाने आज पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार १६ ते २० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २१ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २७ डिसेंबरला दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. नऊ जानेवारीला मतदान होणार असून १० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत सुनील शेळके हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली होती. त्यामुळे नगरपरिषदेतील त्यांची जागा रिक्त झाली होती.

सुनील शेळके यांच्या पाठोपाठ त्यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनीही गेल्या महिन्यात नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे सत्तारूढ भाजपचे सभागृहातील स्पष्ट बहुमत संपुष्टात आले आहे. नगराध्यक्ष चित्रा जगनाडे भाजपच्या असल्याने त्यांच्या निर्णायक मताने भाजपकडे कामचुलाऊ बहुमत उरले आहे.
या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक सत्तारूढ भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षांतर करून आमदार झाल्यानंतर नगरपरिषदेतील रिक्त जागी स्वतःच्या मर्जीतील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप बाजी मारणार की आमदार शेळके आपल्या प्रभागावरील वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.