Maval News : कान्हे व मळवली येथील रेल्वे उड्डाणपूलांच्या कामासाठी आमदार शेळके यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा

उड्डाणपुलासंदर्भात रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे आमदार सुनिल शेळके यांची मागणी

एमपीसी न्यूज – कान्हे व मळवली येथील रेल्वे उड्डाणपूलांची कामे त्वरित सुरू करावीत तसेच पुणे-लोणावळा ही लोकल सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. आमदार शेळके यांनी बुधवारी (दि. 6) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेतली. आमदार शेळके यांनी मावळ मतदारसंघातील केंद्राच्या अखत्यारीतील कामांसाठी देखील पाठपुरावा सुरू केला आहे.

मावळ तालुक्यातील कान्हे व मळवली या दोन्ही रस्त्यांवरील रेल्वेक्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कान्हे व मळवली येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. परंतु वारंवार पाठपुरावा करुनही या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाबाबत दिरंगाई होत आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत करण्याचे निश्चित झालेले असून या संदर्भात रेल्वे बांधकाम विभागाने सुचविल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने बदल करून रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

त्याचप्रमाणे या उड्डाणपुलाच्या कामासाठी केंद्र शासन 50 टक्के व राज्य शासन 50 टक्के निधीची तरतूद करणार असून यातील कान्हे येथील उड्डाणपुलासाठी राज्यशासनाने 31 मार्च 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 3 कोटी 15 लाख रुपयांचा आपला पहिला हिस्सा उपलब्ध करून दिला आहे. तरी देखील उड्डाणपुलाच्या कामास दिरंगाई होत असून या उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळावी.

तसेच मावळ मतदारसंघातील लोणावळा हे पर्यटन क्षेत्र असून येथे वर्षभर पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु कोरोना काळापासून पुणे ते लोणावळा दरम्यान असलेल्या लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र आता कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.तरी त्यादृष्टीने संबंधितांना आपण उचित निर्देश द्यावेत,अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे आमदार शेळके यांनी केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री दानवे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार सुनिल शेळके यांना दिले आहे.

कान्हे येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी व अवजड वाहने येण्यासाठी होणाऱ्या अडचणीमुळे आंदर मावळातील टाकवे एमआयडिसीतील अनेक कंपन्या स्थलांतरित होत असून या पुलाचे काम लवकरात लवकर झाल्यास येथील कंपन्यांचे स्थलांतर थांबेल व याभागातील नागरिकांचा रोजगार टिकून राहील. यामुळे आमदार सुनिल शेळके या संदर्भात सातत्याने रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करून देखील या कामात दिरंगाई होत असल्याने आमदार शेळके यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय राज्यरेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.