MLA Siddarth Shirole: वैद्यकीय सुविधा वाढवा, लॉकडाऊन हा उपाय नाही – सिद्धार्थ शिरोळे

MLA Siddarth Shirole: Increase medical facilities, lockdown is not the solution - Siddharth Shirole मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. उलट या  कालावधीत वैद्यकीय सेवा, सुविधा मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

कोरोना संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा वैद्यकीय सुविधांचा आलेख अधिक वर असायला हवा होता, असेही शिरोळे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनचा पहिला टप्पा शंभर दिवसांचा होता. त्या काळातही रुग्णसंख्या वाढत राहिली याकडे मी वारंवार लक्ष वेधले. साथीवर अभ्यास केलेल्या अभ्यासकांनीही वेळोवेळी साथीचे वाढते धोके लक्षात आणून दिले. पुण्याची स्थिती आटोक्याबाहेर जाईल, अशी जाणीव देण्यात आली होती. तरीही त्याबाबत उपाययोजना करण्यात राज्याचे नेतृत्व अपयशी ठरले, असे मला खेदाने नमूद करावे लागत आहे.

कोरोनाच्या रुग्णांवर तातडीच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड्स तसेच अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत आणि अशातच या आजाराच्या एक हजार नवीन रुग्णांची भर सध्या दिवसाला पडते आहे हा आरोग्य सेवेसंदर्भात धोक्याचा इशारा आहे असे शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

शहरातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच लॉकडाऊन लादणे अन्यायकारक आहे. आरोग्य यंत्रणा जर यापूर्वीच व्यवस्थित कार्यरत ठेवल्या असत्या तर हा लॉकडाऊन टाळता आला असता, असेही शिरोळे यांनी म्हटले आहे.

देशातील रुग्णांचा विचार करता पुण्यात रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. दहा हजारहून अधिक बेड्सची आणि अन्य वैद्यकीय सुविधांची सोय येथे उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण, राज्यसरकार रुग्णांचे चुकीचे आकडे दाखवून, चुकीची माहिती देऊन येथील जनतेची दिशाभूल करीत आहे. येथे अद्यापही नेमके नियोजन झालेले नाही, असा आरोप आमदार शिरोळे यांनी केला.

गेले शंभर दिवस कोरोनाच्या साथीशी डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलमधील सगळा स्टाफ, पोलीस, कार्यकर्ते लढत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्याला भेट द्यावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना वाटले नाही, ते आलेही नाहीत. सद्यस्थितीत राज्यात सर्वश्रेष्ठ नेतृत्त्वाचा अभाव दिसतो आहे.  मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींशी संवादही साधलेला नाही. त्याचप्रमाणे पुण्यातील साथीच्या स्थितीबद्दल मी पाठविलेल्या मेल्सना प्रतिसाद मिळालेला नाही इतके दुर्लक्ष मुख्यमंत्री कार्यालयाकडून झालेले आहे, याकडेही शिरोळे यांनी लक्ष वेधले.

नव्याने जाहीर केलेला लॉकडाऊनचा कालावधी दहा दिवसांचा आहे. पण, आधीचे शंभर दिवस मिळूनही ज्यांना कोरोनाच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय दर्जा उंचावणे जमलेले नाही. त्यांना या दहा दिवसांमध्ये काही करणे जमणार आहे का, असा प्रश्न शिरोळे यांनी विचारला आहे आणि त्याबरोबरच तो दर्जा वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.