Vadgaon Maval News : याला हुजरेगिरी नाही, संस्कृती म्हणतात… – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – शरद पवार यांना खुर्ची देणारे खासदार संजय राऊत हे हुजरेगिरी करतात, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, याला हुजरेगिरी नाही, संस्कृती म्हणतात. भाजपाला आपल्या संस्कृतीचा विसर पडला आहे. मोठ्यांचा आदर करण्याची ही संस्कृती संजय राऊतांकडून आपण शिकावी, असे उत्तर आमदार सुनील शेळके यांनी दिले.

मावळ तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलेच वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी चांगलेच उत्तर दिले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मैदानात येत आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली. दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा प्रतिउत्तर दिले आहे. आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी (दि. १३) वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेतली.

मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर उरूस साजरा झाल्याच्या खोट्या बातमी संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केलेले वक्तव्य, त्यावर आमदार शेळके यांनी केलेले प्रत्युत्तर व यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यावर सत्तेचा अहंकार झाल्याबाबत केलेला आरोप, याबाबत आमदार शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सडकून टीका केली.

आमदार शेळके म्हणाले, अतुल भातखळकर हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहेत.त्यामुळे सर्वप्रथम त्यांनीच कुठलीही प्रतिक्रिया देताना जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे. भातखळकर यांना आम्ही मावळात आणतो किंवा ते सांगतील त्या ठिकाणी घेऊन येतो, त्यांना अडवून दाखवा, या भेगडे यांनी दिलेल्या इशाऱ्याला उत्तर देताना आमदार शेळके यांनी मी आठ दिवस इथेच थांबतो, तुम्ही त्यांना घेऊन या असा इशारा दिला.

एका अभिनेत्रीची हुजरेगिरी असा उल्लेख आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्याबाबत केला होता. यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी ‘शरद पवारांना खुर्ची देणारे खासदार संजय राऊत हे हुजरेगिरी करतात’ असे म्हटले होते. यावर शेळके यांनी प्रत्युत्तर देताना ‘राऊत यांच्या भूमिकेला हुजरेगिरी नाही, तर ज्येष्ठांचा सन्मान करण्याची संस्कृती म्हणतात’ असे म्हटले आहे.

भाजपाला देहूत उमेदवार नाही, तळेगाव नगरपरिषदेतील तुमचे नगरसेवक भ्रष्टाचारात अडकले, लोणावळ्यातील नगरसेवक तुमच्या मागे होते त्यातील नाराज आमच्या पाठीशी आले. रस्ते, पाणी योजना व विकास कामांवर बोलायला जागाच नाही, त्यामुळेच भाजपा हे समाजात तिढा निर्माण करण्याचे काम करतात. मात्र विकास कामांच्या जोरावरच मावळची जनता आमच्या पाठीशी आहे असे आमदार शेळके म्हणाले.

मावळच्या जनतेला अहंकार चालत नाही, तो जनतेने दोन वर्षांपूर्वीच मोडला आहे. अहंकार आला असेल तर मावळची जनता मलाही जागा दाखवील, अशी स्पष्टोक्ती करत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केलेला आरोप आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत धुडकावून लावला.

कोणत्याही कार्यक्रमपत्रिकेवर निमंत्रिताला विचारल्याशिवाय नाव टाकले जात नाही, या भेगडे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना आमदार शेळके यांनी भेगडे यांच्याच हॉटेलची पत्रिका पत्रकार परिषदेत दाखवून यावर नाव टाकताना भेगडे यांनी मला विचारले होते का? असा सवाल शेळके यांनी केला.

तसेच, आमदार शेळके प्रशासकीय अधिकाऱ्यांना अरेरावी करतात या टिकेला उत्तर देताना आमदार शेळके यांनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी कधीच माफ करणार नाही वा थारा देणार नाही, असेही स्पष्ट शब्दात सुनावले. जो अधिकारी काम करतो, त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. अधिकाऱ्यांशी कसे वागावे हे आम्हाला शिकवायची गरज नाही, उलटपक्षी तुम्हीच अधिकाऱ्यांना पाठीशी घालता असा प्रतिटोला आमदार शेळके यांनी लगावला.

भातखळकरांना म्हणाले होते, तुम्ही असं सामाजिक तेढ निर्माण करायचं जे वक्तव्य केलं, ते परत बोलून दाखवा, मग मावळात येऊन दाखवा, असे शेळके म्हणाले होते. त्याला उत्तर देताना सुनिल शेळके यांनी तारीख आणि वेळ सांगावी, अतुल भातखळकरांना मावळात आणतो, बघू तुम्ही कसे अडवतात असे गणेश भेगडे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.