Maval : कामशेत उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – कामशेत उड्डाणपुलाचे काम लांबल्यामुळे वाहनचालकांबरोबरच स्थानिक रहिवाशांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून हा उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशा सूचना मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी आज दिल्या.

आमदार शेळके यांनी कामशेत येथे जाऊन पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहाणी केली. या कामास विलंब लागण्या मागील कारणांची माहिती घेतली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) कार्यकारी अभियंता राकेश सोनोने, उपअभियंता परमार, भूसंपादन विभाग अधिकारी प्रवीण तायडे, खडकाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तानाजी दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे तसेच अमोल कडू, महेश शेट्टी, रोहिदास वाळुंज, दत्ता शिंदे, सुश्रुत निस्ताने, नारायण मालपोटे, नीलेश मराठे.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

उड्डाणपुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून उच्चदाब वीजवाहिन्या (हाय टेन्शन लाईन) बाजूला स्थलांतरीत करण्याचे काम झाल्यावर हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करता येईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामात काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी आपण सर्व मदत करू, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

कामशेतमधील स्थानिक रहिवाशांशी आमदार शेळके यांनी चर्चा केली. उड्डाणपुलाचे काम रेंगाळल्यामुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय त्यांनी समजून घेतली. या कामातून सर्व अडचणी दूर करून लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.