Vadgoan Maval : आमदार सुनील शेळके यांच्याकडून कान्हे रेल्वे उड्डाणपूलच्या कामाची पाहणी

एमपीसी न्यूज : कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाबाबत मध्य रेल्वे विभागाचे मुख्य पूल निर्माता अभियंता बी.नंदराम, उप अभियंता रिजवान अहमद व मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवार दि.६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली.

कान्हे-टाकवे बुद्रुक औद्योगिक क्षेत्राच्या मार्गावरील अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा रेल्वे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. आंदर मावळच्या दळणवळणाचा हा एक प्रमुख मार्ग आहे. रेल्वे गाड्या ये-जा करत असल्याने कान्हे रेल्वे गेट वारंवार बंद होते. यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. कान्हे रेल्वे उड्डाणपूल नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक तसेच इतर वाहतुकीमुळे स्थानिकांसह इतरांची गैरसोय होत आहे.

या उड्डाणपुलाचे काम रखडल्याने आंदर मावळच्या सर्वांगीण विकासात अडचणी निर्माण होत आहेत.

कान्हे रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी संबंधित विभागाचे हे आश्वासक पाऊल आहे,असे आमदार शेळके यांनी सांगितले.

आमदार शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्यास सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आले होते. प्रत्यक्षात या पुलाचे काम करताना पर्यायी मार्गावरुन कशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था करावी लागेल तसेच प्रत्यक्ष कामासाठीचे भूसंपादन व इतर गोष्टींची माहिती घेत अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बी.एन. बहिर, उपअभियंता वैशाली भुजबळ, सरपंच विजय सातकर, उपसरपंच महेश सातकर, प्रकाश आगळमे, ग्रामपंचायत सदस्य आशाताई सातकर, अश्विनीताई शिंदे, नामदेव शेलार, बाबाजी चोपडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.