Maval News : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा गावोगाव दौरा

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत आमदार सुनील शेळके आणि तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी गावोगाव जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी आमदार स्वतः वाचून दाखवत त्या अडचणीचे निवारण करण्याची संबंधित यंत्रणांकडून वेळ जाणून घेत आहेत. तसेच तत्काळ सुटणा-या समस्यांचा लगेच निपटारा देखील केला जात आहे. यामुळे मावळ मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या संकल्पनेतून “राष्ट्रवादी आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आमदार शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व अधिकारी सहभागी होत आहेत.

या कार्यक्रमात केवळ पक्षाचा अजेंडा न सांगता नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर देखील भर देण्यात आला आहे. आणि यासाठी ज्या गावात हा कार्यक्रम होणार आहे त्या गावांतील नागरिकांना आदल्या दिवशी या कार्यक्रमाच्या माहिती पत्रकांसोबत त्यांच्या समस्या व तक्रारी लिहून देण्यासाठी अर्ज देण्यात येत आहेत व कार्यक्रमाच्या दिवशी आमदार शेळके स्वतः नागरिकांच्या आलेल्या लेखी तक्रारींचे वाचन करून निवारण करत आहेत.

यामध्ये नागरिकांमधून विशेषतः अनियमित पाणी पुरवठा, रेशनचे धान्य, अंतर्गत रस्ते, पथदिवे, स्मशानभूमी निवाराशेड, समाज मंदिर, घरकुल व पेन्शन योजना याबाबत नागरिक तक्रार करत आहेत. या कार्यक्रमा दरम्यान नागरिकांमधून आलेल्या तक्रारींचे आमदार शेळके प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ निवारण करत आहेत तर रस्ते, पाणी आदी समस्या सोडविण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देऊन काम कधी मार्गी लागणार आहे. याची वेळ देखील देत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.विशेषतः महिला व वृध्द नागरिकांच्या समस्या तात्काळ सुटत असल्याने त्यांच्याकडून आमदारांचे आभार मानले जात आहेत.

 या कार्यक्रमांदरम्यान आमदार शेळके प्रत्येक गावातील सुरू असलेल्या विकास कामांची देखील पाहणी करत असून विकासकामांची गुणवत्ता पाहून संबंधित ठेकेदारांना सूचना करत असून नागरिकांना देखील सुरू असलेल्या विकास कामांवर लक्ष देण्याचे आवाहन करत आहेत.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे – पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे राष्ट्रवादी आणि घर तिथे कार्यकर्ता ही संकल्पना घेऊन राष्ट्रवादी आपल्या दारी हा उपक्रम राबवित असताना, पवार साहेबांनी दिलेला 80 टक्के समाजकारण व 20 राजकारणाचा विचार जोपासून या कार्यक्रमात आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.