Bhosari : भोसरीकरांच्या आरोग्यासाठी आमदार लांडगे कायम आग्रही

डॉ. अन्नू गायकवाड यांचे मत

एमपीसी न्यूज – भोसरीकरांच्या आरोग्यासाठी आमदार महेश लांडगे सतत आग्रही आहेत. त्यातूनच त्यांनी ‘व्हीजन 2020’ च्या माध्यमातून ‘ग्रीन भोसरी-क्लीन भोसरी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. भोसरीला ग्रीन आणि क्लीन करण्यासाठी अविरत श्रमदान, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, सायकलमित्र या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत, असे मत डॉ. अन्नू गायकवाड यांनी व्यक्त केले.

डॉ. गायकवाड म्हणाले, “अविरत श्रमदान, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, सायकलमित्र या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीसाठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे पाच हजार सायकलपटू सहभागी झाले होते. चित्रकला, निबंध आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. इंद्रायणी स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम आम्ही सुरू केली आहे. त्या माध्यमातून खासगी शाळांमधील 67 हजार विद्यार्थी आणि शासकीय शाळांमधील 63 हजार विद्यार्थ्यांसाठी ‘आम्ही पाहिलेली नदी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

पुणे ते पंढरपूर, पुणे ते भीमाशंकर, अष्टविनायक तसेच जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी आदि मोहिमा सायकलमित्र संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीसाठी राबविल्या आहेत. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत दोन हजारहून अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी नियमित प्रयत्न केले जातात. शनिवार आणि रविवारी स्वयंसेवक पूर्णवेळ वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत असतात. प्लास्टिकमुक्त भोसरी अभियानाच्या माध्यमातून भाजीवाले, फुलवाले, छोटे व्यावसायिक यांच्यामध्ये जनजागृती उपक्रम राबवले जातात, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, “दिघी येथील दत्तगड डोंगरावर स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण राबविले जाते. सध्या निर्माण होणारी उद्याने ऑक्सिजन पार्क म्हणून तयार होणार आहेत. त्यात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींना प्राधान्य देण्यात आले आहे. भोसरीमधील उड्डाणपुलाच्या खालील परिसर अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार आधुनिक करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये स्वच्छता आणि हिरवळ यांचा समावेश आहेच.

जलपर्णीमुक्त नदी आणि निर्माल्यमुक्त नदी आदी उपक्रमही राबवले जातात. गणेशोत्सवात मूर्तीदानासाठी नागरिकांना आवाहन केले जाते. त्याआधारे जमा झालेल्या मूर्त्यांचे दान केले जाते. भटक्या प्राण्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते. खिळे व फलक मुक्त वृक्ष असे अनेक उपक्रम राबवत भोसरीची ओळख आगामी काळात ‘ग्रीन भोसरी-क्लिन भोसरी’ अशी निर्माण करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.