Pimpri : महाआघाडीच्या पिंपरी,चिंचवड, भोसरीमधील उमेदवारांना ‘मनसे’चा बिनशर्त पाठिंबा

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे, महाआघाडीचे चिंचवडचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीतील उमेदवार विलास लांडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याबाबत मनसेचे नेते बाबु वागसकर यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आमची लढाई असून मनसेचे कार्यकर्ते तीनही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, विरोधी पक्षनेते नाना काटे, दत्ता साने, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, नगरसेविका निकिता कदम, मनसेच्या महिला आघाडीच्या अश्विनी बांगर, रुपेश पटेकर, राजू सावळे, अंकुश तापकीर आदी उपस्थित होते.

बाबु वागसकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने राज्यात 106 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. जिथे उमेदवार दिले नाहीत. तिथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे आणि महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. कोणत्याही अटी-शर्थीविना हा पाठिंबा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी मनसेला पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रचाराचा शेवटचा आठवडा राहिला आहे. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली, पदयात्रेत मनसेचे कार्यकर्ते सक्रीय होतील. हिरिरीने प्रचारात सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

विलास लांडे म्हणाले, ”हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई आहे. त्याकरिता मनसेने पाठिंबा दिला. त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. शहरातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मनसे आणि आम्ही कायम सोबत राहू, लढा दिला जाईल. महाआघाडीचे तीनही उमेदवार 100 टक्के निवडून येणार असल्याची खात्री आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.