MNS vs AMAZON : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून पुण्यात ॲमेझॉनची तोडफोड !

एमपीसी न्यूज : मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील अ‌ॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खळ्ळखट्याक आंदोलन करत तोडफोड करण्यात आली आहे.

मराठी भाषेला अ‌ॅमेझॉनच्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने केली होती. अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते वेबसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अ‌ॅमेझॉननं मनसेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतप्त व आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अ‌ॅमेझॉन विरोधात ‘नो मराठी, नो अ‌ॅमेझॉन’ मोहीम सुरु केली होती. त्यामुळे मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकवत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

दरम्यान, मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.