Pune : धूळखात पडलेले ‘डस्टबिन’ नागरिकांना द्या अन्यथा आंदोलनास तयार रहा !

मनसेचा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला इशारा

एमपीसी न्यूज – कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांच्या कररुपी पैशातून गेली अनेक महिने झाले कचऱ्याच्या डब्यांची (डस्टबिन) खरेदी केली आहे. परंतु बोर्डाच्या नाकर्तेपणामुळे ते अद्यापही नागरिकांना वाटले गेले नसून हे डस्टबिन बोर्डाच्या भांडार विभागात धूळ खात पडले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 

नागरिकांच्या घरातून निघणा-या कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे बोर्ड प्रशासन नेहमी नागरिकांना सांगत असते. तसेच कचरा वर्गीकरण करण्याची सवय नागरिकांमध्ये रुजावी म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने मोठ्या प्रमाणात डस्टबिन खरेदी केले होते. मात्र ते डस्टबिन नागरिकांपर्यंत पोहचलेच नसल्याने नागरिकांच्या पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण देखील करता येत नाही. त्यामुळे हे धूळखात पडलेले डस्टबिन त्वरित नागरिकांना वाटण्यात यावे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुहास निम्हण यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

दरम्यान, नुकतेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचऱ्याच्या गाड्या गावात येऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडी होण्याची मोठी शक्यता आहे. अशात कचऱ्याचे वर्गीकरण करणे तितकेच गरजेचे असताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या भोंगळ कारभाराने पुणेकरांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.