Pune : मोबाईलची फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रकारीतेतील अक्षर ओळख – शि. द. फडणीस

एमपीसी न्यूज – अलीकडच्या काळात छायाचित्रकारितेमध्ये अनेक बदल होत आहेत. मोबाईलमुळे फोटोग्राफी खूपच सोपी बनत आहे. तरूणाई मोबाईलच्या कॅमेर्‍यातून कायम सेल्फी काढताना पहायला मिळते. मोबाईलची फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रकारीतेतील अक्षर ओळख आहे. मात्र, त्याचे पुस्तक लिहायचे झाले तर अनुभवी, ज्येष्ठ, प्रकाश छायाचित्रकारांची आवश्यकता असते. असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले.

गेली ४१ वर्षे गायन – वादन – नृत्य या हिंदुस्थानी संगीत प्रकारांच्या प्रसाराकरिता कार्य करीत असलेल्या गानवर्धन या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘संगीत – प्रकाश छाया कलाकृती पुरस्कार’ प्रसिद्ध प्रकाश छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांना, तर ‘स्वरसाधना’ पुरस्कार प्रख्यात सुगम गायिका अनुराधा मराठे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. रुपये २५ हजार आणि मानपत्र असे ‘संगीत – प्रकाश छाया कलाकृती पुरस्काराचे’ स्वरुप असून हा पुरस्कार डिम्पेक्स इंटरनॅशनल यांनी पुरस्कृत केला असून पद्मश्री कै. डॉ. शरदकुमार दीक्षित व कै. प्रभा ठकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला गेला. तर रुपये ११ हजार आणि मानपत्र असे ‘स्वरसाधना’ हा पुरस्काराचे स्वरुप असून हा पुरस्कार सुधीर कुलकर्णी यांनी पुरस्कृत केला आहे. कै. सरला नारायण कुलकर्णी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला गेला.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी रवींद्र दुर्वे, प्रमोद गोसावी, वासंती ब्रम्हे, लता साठे उपस्थित होते.

यावेळी फडणीस म्हणाले, आत्ताच्या काळातील तरूणाईला बनायचे असते, चित्रकार मात्र, त्याच्या हातात पडतो कॅमेरा. त्यामुळे अनेक जण छायाचित्रकार बनतात. पत्रकार फोटोग्राफर होतो तेव्हा, त्याच्या फोटोतून संघर्ष, सामाजिकता, नैतिकतेची जाणीव दिसून येते. तोच खरा फोटो ग्राफर ठरतो आणि समाजाचा आरसा बनतो.यावेळी सतीश पाकणीकर आणि अनुराधा मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं. अजय पोहनकर यांची मैफल झाली. त्यांना भारत कामत (तबला) आणि मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) साथ संगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा राडकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.