Pune Crime News : कोथरूड परिसरातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील सुतारदरा परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुन्हेगार कुणाल धर्मे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. कुणाल हेमंत धर्मे (वय 21), यशराज हनुमंत शिंदे (वय 19), योगेश राम दबडे (वय 21), धीरज नथू कुडले (वय 27), महेश श्याम सातपुते (वय 26), रोहित सुरेश सातपुते (वय 26) संतोष निवेकर आणि तुषार पोकळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोथरूड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. टोळी प्रमुख कुणाल धर्मे याने कोथरूड परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परिसरात दहशत निर्माण केली होती. या आरोपींनी कोथरूड परिसरात संघटितपणे वैयक्तिकपणे खुनाचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्रद्वारे जखमी करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, वाहन चोरी, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे हिंसक गुन्हे केले आहेत.

या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा त्यांच्या वर्तणुकीत बदल होत नव्हता. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.