Nigdi : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव 

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात भात लावणीचा अनुभव घेतला. अनेक वेळा शहरी भागातील मुलांना कोणते पीक कुठे येते याची माहिती नसते. केवळ पुस्तकात शिकून विद्यार्थ्यांना शेती आणि त्यातील पिकांची माहिती होणार नाही तर प्रत्यक्ष अनुभूती महत्वाची असून याच हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मॉडर्नचे प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी सांगितले.

यासाठी भिंतीपलीकडील शाळा उपक्रमांतर्गत चिखली येथील शेतकरी दत्तू भुजबळ यांच्या भातशेतीस विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रत्यक्षात गुडघाभर पाण्यात विदयार्थी गेले आणि चालू झाली भातलावणी. यावेळी भातलावणी करणा-या महिलांबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी भर पावसात भात लावणी केली. यातून शेतक-यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. नंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी भात पिकाबद्दल अनेक प्रश्न विचारून माहिती मिळविली. यामध्ये भात लावणी पूर्व मशागत कोणती ? भाताचे पीक किती दिवसात येते ? भातशेतीचे संरक्षण कसे करायचे ? भातपिकाची कापणी साठवण आणि वाळवण या सर्व प्रक्रियेची माहिती घेतली.

यामुळे विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठेचे महत्व कळाले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी मार्गदर्शन केले तर शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यासाठी शिक्षक खंडू खेडकर, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.