Pimpri : मोदी, फडणवीस व भाजपाने देशाची माफी मागावी – सचिन साठे

 एमपीसी न्यूज –  नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होईपर्यंत स्व:ताच्या पत्नी विषयी माहिती दिली नाही. ‘राफेल’ कराराबाबत सर्वेाच्च न्यायालयात सरकारने खोटी माहिती सादर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. यामुळे देशातील सव्वाशे कोटी जनता, निवडणूक आयोग व न्यायालयाची नरेंद्र मोदी, भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली आहे. त्याबाबत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. 
        शहर कॉंग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या जनसंवाद अभियान कार्यक्रमाअंतर्गत रविवारी (दि. 16 डिसेंबर) अंजठानगर येथे झालेल्या बैठकीत साठे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय विभाग उपाध्यक्ष गौतम आरकडे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, हिरामण खवळे, बिंदू तिवारी, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी सेल शहराध्यक्ष किशोर कळसकर, सेवा दल शहराध्यक्ष मकरध्वज यादव, असंघटीत कामगार सेलचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, हुरबानो शेख, परशूराम गुंजाळ, मिनाताई कांबळे, शिवाजी थोरात, दिलीप जोंधळे, डी. एल. जाधव, विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे, शैलेश आनंतराव, तुषार पाटील, ॲड. अनिरुध्द कांबळे, बाबा बनसोडे, मनसफ अली खान आदी उपस्थित होते.

 साठे म्हणाले की, प्रत्येक नागरीकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करु, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ, शेतक-यांचे पूर्ण कर्ज माफ करुन शेतीमालाला हमीभाव देऊ अशी शेकडो आश्वासने लोकसभा निवडणूकीपुर्वी मोदी, शहा यांनी देशातील जनतेला दिली. मात्र, यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही. याबाबत मोदी, शहा व भाजपाने सर्व नागरीकांची प्रथम माफी मागावी. राफेल प्रकरणी सर्वेाच्च न्यायालयात खोटी माहिती देणारे सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असाही प्रश्न साठे यांनी उपस्थित केला.

 

साठे पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर व्हावे यासाठी अयोध्येत जाऊन केलेली मागणी व गंगाआरती हा केवळ दिखावा आहे. मागील साडेचार वर्षात भाजपा सेनेने कधीही रामाचे व राममंदिराचे नाव घेतलेले नागरीकांना आठवत नाही. आता निवडणूका आल्या की, युती सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारच्या नाकर्तेपणाकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच उध्दव ठाकरेंना आता रामाचा व विठ्ठलाचा आसरा घेण्याची वेळ आली आहे. मागील साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेची ‘देवेंद्र नागपूरकर सह उध्दव मुंबईकर यांच्या बहुरंगी, बहुढंगी लोकनाट्यामुळे’ फसवणूक झाली आहे. उध्दव सेनेने युतीची आम्हाला गरज नाही अशा वल्गना करायच्या आणि मुख्यमंत्र्यांनी युती होणारच असे वगनाट्य सादर करायचे. या वगनाट्यामुळे नागरीकांचे फक्त मनोरंजन झाले.

शेतकरी, कामगार, लघु उद्योजक, गृहीणी, विद्यार्थी यांचे प्रलंबित प्रश्न व कायदा, सुव्यवस्थेचा झालेला खेळखंडोबा यामुळे मतदार त्रस्त झाले आहेत. हे ओळखूनच उध्दव ठाकरेंनी भाजपाच्या मदतीसाठी पुन्हा राममंदिराचा प्रश्न पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरी देखील मागील आठवड्यात राज्यस्थान, मध्यप्रदेशासह इतर तीन राज्यातील विधनसभा निवडणूकीत भाजपा पराभूत झाली. सामान्य जनतेच्या रोजच्या गरजेचे, जिव्हाळ्याचे प्रश्न फक्त कॉंग्रेस व राहुल गांधीच सोडवू शकतात यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळेच कॉंग्रेसला यश मिळाले. भाजपचा या पाचही राज्यातील पराभव म्हणजे देशपातळीवर भाजपाचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचेही साठे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.