Pune News : राहुल गांधींना उपदेश करण्यापेक्षा महागाईवर बोला; मोहन जोशी यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

एमपीसी न्यूज – हिंदू आणि हिंदुत्व यावर कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भाष्य केलं, आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यावर उपदेश करण्यापेक्षा सध्याच्या वाढत्या महागाईबद्दल बोलावे आणि त्याचा निषेध करावा, असा टोला माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी लगावला.

हिंदू आणि हिंदुत्व यावर राहुल गांधी यांच्या मनात संभ्रम असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आणि हिंदू आहात, तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचा निषेध करा, असा उपदेश त्यांनी खासदार राहुल गांधी यांना केला. याचा समाचार घेताना मोहन जोशी म्हणाले, राहुल गांधी हे काँग्रेसचे अखिल भारतीय नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाची उंची चंद्रकांत पाटील गाठू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींना उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांना ते शोभत नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी पाटलांना बराच वेळ लागणार आहे. त्यांनी अशा भानगडीत पडू नये.

यापेक्षा मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाई वाढते आहे, त्याविरुद्ध आवाज उठवून चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध करावा. तसेच, पाटील यांना पुण्यातून आमदारकी मिळालेली आहे. पुणे महापालिकेत त्यांच्याच भाजपची सत्ता आहे आणि नदी सुधारणा, २४तास पाणीपुरवठा योजना असे लांबलेले प्रकल्प तसेच रस्त्यातील खड्डे यावर पाटील यांनी मतप्रदर्शन करावे. आपल्या पक्षाचे अपयश झाकून ठेवू नये, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.