Pune : अखेर आघाडीला पुण्यासाठी उमेदवार मिळाला, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर 

एमपीसी न्यूज- पुणे लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झाली नसताना. पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीपासून काल प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे काँग्रेस हायकमांड केव्हा उमेदवार जाहीर करणार याकडे शहर काँग्रेसचे लक्ष लागून राहीले असताना. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता महायुती कडून गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी यांच्यात लढत पाहण्यास मिळणार आहे.

मागील काही दिवसापासुन देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक राजकीय पक्षाकडून पाहावयास मिळाली. तर पुण्याच्या जागेसाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटला. महायुतीकडून प्रचारास सुरुवात झाली. मात्र आघाडीकडून केवळ माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे आणि शेकाप नेते प्रविण गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी दिली जाणार अशी चर्चा ऐक येण्यास मिळत होती.

त्यामध्ये अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांचे नाव आघाडीवर होते. मात्र या दोघांना मागे टाकत पुणे लोकसभेच्या जागेसाठी उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक असताना काँग्रेस हायकमांडने सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. तर आता त्यामुळे आता महायुतीकडून गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी यांच्यात लढत पाहण्यास मिळणार आहे. तर कोण विजयी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोहन जोशी यांची प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षाच्या वतीने, पुणे लोकसभा मतदार संघासाठी, सांगोपांग विचार करून माझी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली, त्याबद्दल मी कॉंग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष श्री. राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. मल्लिकार्जून खरगे, पदेशाध्यक्ष श्री. अशोकरावजी चव्हाण आणि सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो.

माझ्या मते, लोकसभेची ही निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने जीवन-मरण्याची आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने मागील पाच वर्षात ज्या एककल्ली, असंवेदनशील आणि एकाधिकारशाही कारभार केला, त्यामुळे लोकशाही, संविधान, मूलभूत स्वातंत्र्य, या सारख्या शाश्वत मूल्यांच्या रक्षणाची जबाबदारी कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्षांच्या आघाडीवर आली आहे. या विचारांच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठीच्या लढाईत, कॉंग्रेस पक्षाने माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोंपवली आहे.

मागील 40 वर्षांहून अधिक काळ एक कामगार, श्रमिक पत्रकार, युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जे कार्य केले आहे, त्याचा आणि कॉंग्रेस पक्षाच्या आणि आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच सन्मान झाला आहे, अशी माझी विनम्र भावना आहे.

आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा मला आत्मविश्वास वाटतो.

प्रचंड आर्थिक ताकद, सत्तेची मगरूरी आणि मागील पाच वर्षातील गैरकारभाराला कंटाळलेले मतदार, मोदी सरकारच्या दिखाऊ, खोट्या आणि प्रचारकी कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील, याची मला खात्री वाटते. माझ्या उमेदवारीमुळे, शहरातील सर्व वयोगटातील आणि विशेषतः युवक-युवतींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

समाजातील विविध धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांतातील लोकांना बरोबर घेऊन, विकासाच्या वाटेवर चालण्याची क्षमता फक्त कॉंग्रेस पक्षातच आहे. या कार्यात मला लोकनेते आदरणीय श्री. शरदरावजी पवार, माननीय श्री. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते; तसेच रिपब्लिकन पक्षासारखे मित्रपक्षांच्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्यामुळेच, देशाचे भवितव्य ठरविणा-या निवडणुकीच्या संग्रामात मला उत्तम यश मिळेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. या सर्वांच्या बळावर मी मोदी सरकारच्या गैरकारभाराची लक्तरे मतदारांपुढे प्रभावीपणे मांडत असतानाच, पुण्याच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या समग्र विकासाचा शहर पातळीवरील संयुक्त जाहीरनामा देखील मांडणार आहे.

पुणेकरांच्या सादेला प्रतिसाद देणारा मी कार्यकर्ता असून, या निमित्ताने शहराच्या कानाकोप-यात पोहोचून लोकांशी संवाद साधण्याची आम्ही पराकाष्ठा करून, विजयश्री खेचून आणू, असा आम्हा सर्वांनाच विश्वास वाटतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.