Akurdi news : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि उपमहापौरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात येणार आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महापालिकेसमोर सर्वपक्षीय पदाधिकारी, कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहीती कामगार नेते कैलास कदम यांनी दिली.

शनिवारी (दि. 12) कामगार संघटना संयुक्त कृती समितीची श्रमशक्ती भवन येथे बैठक झाली. बैठकीसाठी समितीचे समन्वयक मानव कांबळे, जेष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, दिलीप पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक मारुती भापकर, कामगार नेते इरफान सय्यद, अनिल रोहम, सचिन देसाइ, गणेश दराडे, संजय गायखे, नरेंद्र सोनवणे, गिरीश वाघमारे, जनार्धन पोलकडे, काशिनाथ नखाते, रोमी संधू, प्रदीप पवार, विशाल जाधव, प्रविण जाधव, धनाजी येळकर आदी उपस्थित होते.

मागील आठवड्यात झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर केशव घोळवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कामगार संघटना संयुक्ती कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. महापालिकेसमोर सोमवारी (दि. 14) दुपारी एक वाजता निषेध सभा होणार आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

निदर्शने करताना तसेच आंदोलन करताना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.