Pune News : कोथरुडच्या थोरात उद्यानात साकारणार मोनोरेल

महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना

एमपीसी न्यूज – लहान मुलांसाठी विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करणार असून प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून ही मोनोरेल साकारत असून उद्यानात असणारी ही पुण्यातील पहिलीच मोनोरेल ठरणार आहे.

या मोनोरेल प्रकल्पाबाबत माहिती देताना कोणत्याही महापौर मोहोळ म्हणाले, ‘थोरात उद्यानात साकारत असलेल्या या मोनोरेल प्रकल्पात 72 व्होल्ट डीसी बॅटरी ऑपरेटर मोनोरेल असणार आहे. दोन बोग्या आणि चालकाच्या दोन केबिन असणार आहेत. त्यासाठी 410 आरएमटी ट्रॅक तयार करण्यात येणार असून, सुरक्षा रेलींग, प्लॅटफॉर्म, तिकिट घर याची निर्मिती करण्यात येणार आहे’.

‘मोनोरेल प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कोलकात्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे 5 कोटी 47 लाख रुपयांच्या तरतुदीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

‘पुणे शहराचा विकास करताना जगभरात नव्याने समोर आलेल्या संकल्पनाही आपल्या शहरात याव्यात, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मोनोरेल प्रकल्पाने कोथरूडच्या वैभवात भर पडणार तर आहेच, शिवाय पुणे शहरासाठीही हा अभिनव प्रकल्प ठरणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.