मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Monsoon 2020 Update: खूष खबर! गोवा तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत मान्सून दाखल!

एमपीसी न्यूज – गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर आज गोवा तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. येत्या 24 तासांत मान्सून मुंबई व तर 48 तासांत पुण्यात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

मान्सूनची उत्तर सीमारेषा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, सोलापूर, रामगुंडम, जगदलपूर, गोपाळपूर, अगरतला, चपरमुख, तेजपूर अशी दाखवत आहे.

मान्सून सर्वसाधारणपणे दरवर्षी सात जूनला कोकण व गोव्यात तर 10 तारखेपर्यंत मुंबईत दाखल होतो. यंदा मान्सून केरळमध्ये एक जून या त्याच्या नेहमीच्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच दाखल झाला होता. त्यामुळे कोकण-गोव्यात त्याचे वेळेवर आगमन होईल, अशी अपेक्षा होती, मात्र यंदा नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने गोवा व कोकणात मान्सूनचे आगमन झाले आहे.

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात , गोव्याच्या संपूर्ण भागात, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या
काही भागात, कर्नाटकच्या उर्वरित भागात , रायलसीमा व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीच्या संपूर्ण भागात, तेलंगणाच्या बहुतांश भागात, दक्षिण ओडिशाच्या काही भागात, पश्‍चिम मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात , नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुराच्या उर्वरित भागात, अरुणाचल प्रदेशच्या बहुतांश भागात, आसाम व मेघालयाच्या आणखी काही भागात झाली आहे, असे पुणे वेधशाळेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवा व मराठवाड्यात बहतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

पुढील हवामानाचा अंदाज

11 जून: कोंकण- गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
12-13 जून: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
14 जून: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
15 जून: कोंकण- गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

11 जून: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

12 जून: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. कोंकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

13 जून कोकण गोवा व विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

14 जून कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र्‌ किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

15 जून कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

पुणे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

पुणे शहर व परिसरात येत्या पाच दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही पुणे वेधशाळेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Latest news
Related news