Monsoon News : मॉन्सून पुण्यात नेहमीपेक्षा चार दिवस आधीच दाखल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात शनिवारी (दि. 5) पोहोचलेला मॉन्सून आज (रविवारी, दि. 6) पुण्यात दाखल झाला आहे. यंदा नेहमीपेक्षा चार दिवस लवकर मॉन्सूनचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतची माहिती दिली आहे.

‌मॉन्सून रविवारी (6 जून) अलिबाग, पुण्यापर्यंत पुढे सरकला. त्याचसोबत मॉन्सूनने बंगालच्या उपसागराच्या मार्गाने संपूर्ण ईशान्य भारतही व्यापला. मॉन्सूनची उत्तरसीमा पुण्याच्या पुढे करमाळा (सोलापूर), औसामार्गे (लातूर) मेडक, नालगोंडा – (तेलंगण), रेंताचिंतला, श्रीहरिकोटावरून – (आंध्र प्रदेश) पश्चिम बंगालमधील बागडोगरापर्यंत जात आहे.

दोन दिवस अगोदरच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. रत्नागिरीच्या हरणाई बंदरावरून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून व्यापून काढणार आहे.

मॉन्सूनने शनिवारी (दि. 5) गोवा, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग व्यापला आहे. मॉन्सून प्रगतीची उत्तरसीमा हर्णे, सोलापूर, रायचूर, करनूल, तिरुपती, कुड्डलूर येथून जात आहे. पुढील 24 तासांत मॉन्सून महाराष्ट्रात आणखी प्रगती करण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

रत्नागिरीच्या हर्णे बंदरावरून मॉन्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास सुरु झाला आहे. हा मॉन्सून पुढे दक्षिण मध्य महाराष्ट्र सोलापूर पर्यंत, मराठवाड्याच्या काही भागात पोहोचून पुढे संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

3 जून रोजी लक्षद्वीप, दक्षिण केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत सक्रिय झालेला मॉन्सून शुक्रवारी केरळ आणि तामिळनाडू व्यापून पुढे कर्नाटकच्या दिशेने निघाला. 4 जून रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीसह रायलसीमाच्या काही भागात दाखल झाला.

त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर मॉन्सून 5 जून रोजी दाखल झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.