Lonavala : लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मान्सूनची जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात आज मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांचे पाणीकपात संकट तुर्तास टळले आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. लोणावळ्यातील भांगरवाडी येथे गुलमोहराचे झाड विजेच्या तारेवर पडले. संततधार पावसाने डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागल्याने आज पर्यटनाकरिता आलेल्या पर्यटकांनी पावसात भिजण्याचा तसेच धबधब्यांखाली बसण्याचा मनमुराद आनंद घेतला.


पावसाचा तालुका अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात महिनाभरापासून पावसाची उणिव जाणवत होती. बुधवार व गुरुवारच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी मान्सूनयुक्त पावसाने लोणावळा शहर व संपूर्ण मावळ तालुक्यात हजेरी ल‍ावली, पावसाची ही संततधार आज शुक्रवारी दिवसभर कायम राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे शहरातील मावळा पुतळा चौक, र‍ायवुड येथिल ट्रायोज माॅल समोरील रस्ता, नगरपरिषद रुग्णालयासमोरील रस्ता, भांगरवाडी, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण गावातून जाणारा रस्ता तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणारा वलवण पुलाखालील रस्ता पाण्याखाली गेला होता.

पवना धरण परिसरात दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात काहिशी वाढ झाली आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. पुढिल दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भुशी धरण ओव्हरफ्लो होईल. दरम्यान संततधार व जोरदार पावसामुळे लोणावळा व खंडाळ्यासह पवन व आंदर मावळातील धबधबे वाहू लागले आहेत. भाजे लेणी येथिल धबधब देखील वाहू लागला आहे.
पंधरा दिवसापूर्वी भात पेरणी करत पावसाची वाट पाहणारा बळीराजा मान्सूनच्या जोरदार हजेरीने सुखावला आहे. भात रोपांकरिता आवश्यक असणारे पाणी शेतात जमा झाल्याने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.