Pune News : रस्त्यावरील पार्कींगसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

वाहनतळांमध्ये तीस टक्के कमी शुल्क

एमपीसी न्यूज – शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगित तत्त्वावर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, वाहनतळांच्या तुलनेत रस्त्यावरील पार्कींगसाठी तीस टक्के जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरण राबविण्याचा घाट मार्च 2018 मध्ये महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने घातला होता. याला सत्ताधारी भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आणि विविध समाजसेवी संस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलने केली.

या धोरणासाठी पुणेकरांची नाराजी ओढवून घेऊ नये, यासाठी मुख्य सभेत उपसूचना देऊन प्रमुख पाच रस्त्यांवर प्रयोगित तत्वावर सहा महिन्यासाठी ही योजना राबविण्याचा मार्ग अवलंबण्यात आला. हे पाच रस्ते निवडण्याचा अधिकार महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आला.

यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास 38 रस्त्यांचा सर्व्हे करून त्यातील पाच रस्ते निवडण्याचा प्रस्ताव महापौर कार्यालयास दिला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अनेक स्मरण पत्रे दिली. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

आता महापालिकेतील सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती आल्यानंतर प्रलंबीत पे अ‍ॅन्ड पार्कींगचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. महापालिका सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी पे अ‍ॅन्ड पार्कींग लागू करण्यात येणार आहे. मात्र, रस्त्यावरील पार्कींगसाठी बांधलेल्या व पूर्वीच्या वाहनतळापेक्षा 30 टक्के जास्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.