Akurdi : प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण, आरोग्य रक्षणासाठी संशोधनाची अधिक गरज – डॉ. कार्ल पेरिन

एमपीसी न्यूज – संपूर्ण जगाला प्रदूषणाचा आणि पर्यावरण बदलाचा सामना करावा लागत आहे. मानवाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, आरोग्य आणि पर्यावरण रक्षण व संवर्धनावर अधिक संशोधन करुन योग्य दिशेने नियोजन करण्याची गरज असल्याचे मत इन्स्टिट्यूट फॉर फ्युचर ट्रान्सपोर्ट, सिटी कन्व्हेटरी विद्यापीठाचे संचालक डॉ. कार्ल पेरिन यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचे’ उद्‌घाटन डॉ. पेरिन यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आले. यावेळी केपीआयटीचे राहुल उपल, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, ब्रिटनमधील कोन्व्हेंटरी विद्यापीठाच्या इलेक्ट्रो केमिकल ऊर्जा विभागाचे प्रमुख  रोहित भगत, ऑडी एजीच्या स्टॅटर्जी सस्टेनिबिलीटीचे उपाध्यक्ष डॉ. पिटर ट्रोपेच्यू, कार्यक्रमाचे समन्वयक  राहुल पाटील, समन्वयक केतन देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पेरिन म्हणाले, ब्रिटनस्थित कॉन्व्हेंटरी विद्यापीठाला 175 वर्षांची परंपरा असून विद्यापीठात जागतिक हवामान बदलामुळे होणारे परिणाम, त्यावरील उपाय, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक वाहतूक, आरोग्य, रस्ते, जलमार्ग, लोहमार्ग, हवाई वाहतूक आदी विषयांवर सखोल संशोधन करण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणारी वाहने, मोनोरेल यासारख्या आधुनिक आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.

प्राध्यापक रोहित भगत म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर अधिक प्रमाणात करण्याचे महत्व सर्वांनाच समजले आहे. म्हणून जगभरात बॅटरीवर, विजेवर चालणा-या वाहनांचा वापर गेल्या काही वर्षात वाढला आहे.  डॉ. पिटर ट्रॉमचूह यांनी कनेक्टेड, इलेक्ट्रिक, शेअर या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

केपीआयटी स्पार्कलमध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प मांडले होते. त्यामधून 100 प्रकल्पांची महाअंतिम  फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या 30 प्रकल्पामधून प्रथम, व्दितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण 21 लाखांची विविध बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक केतन देसले यांनी दिली.

प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत भाषण केले. केपीआयटीचे राहुल उपल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विनिला बेडेकर यांनी तर प्राध्यापक राहुल पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.