Maharashtra Corona Update: राज्यात ३१ ते ४० वयोगटातील १० लाखांहून अधिक काेराेनाबाधित

0

एमपीसी न्यूज : देशासह राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यात मागील लाटेच्या तुलनेत यंदाच्या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाणही वाढल्याचे निरीक्षण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी नाेंदवले आहे. त्यानंतर आता राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात ३१ ते ४० वयोगटातील १० लाखांहून अधिक काेराेनाबाधित आहेत.

एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २२.०९ टक्क्यांवर आहे. या वयोगटात १० लाख ८ हजार १४८ कोरोना रुग्णांची नोंद आहे. तर १०१ ते ११० वयोगटातील बाधितांचाही आकडाही ६८८ वर पोहोचला आहे. राज्यातील ३१ ते ४० वयोगटाच्या खालोखाल २१ ते ३० वयोगटात रुग्णांचे प्रमाण जास्त असून ही संख्या ८ लाख ६८६ इतकी आहे.

_MPC_DIR_MPU_II

एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण १७.५१ टक्के आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ६० टक्के आहे, तर महिला रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. तर राज्यात रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. तर ६७ टक्के रुग्ण लक्षण असलेले व लक्षणविरहित आहेत. तर २३ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात, ऑक्सिजनवर असल्याची नोंद आहे.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची लाट सरेल. तसेच, मागील काही काळात तरुणांचा घराबाहेरील वावर वाढता असल्याने संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, दुहेरी मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर पाळावे आणि अतिजोखमीच्या व्यक्तींच्या सहवासात असताना अधिक काळजी घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment