Pimpri: 75 दिवसांत शहरात तीनशेहून अधिक कोरोना रूग्ण

More than 300 COVID-19 patients in Pimpri Chinchwad in last 75 days. वायसीएम व भोसरी रुग्णालयात 281; शहरातील 20 रुग्ण महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिेकनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 75 दिवसांत तीनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्च ते 23 मे या 75 दिवसात आज (शनिवारी) सकाळी नऊपर्यंत  शहरातील 301 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री सातपासून शनिवारी सकाळी नऊ पर्यंत 15 नवीन रुग्णांची भर पडली आहे. या 301 जणांमध्ये महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 281 आणि 20 रुग्णांवर  महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनावर कोणतेही ठोस औषध नसताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे. आजपर्यंत शहरातील 162 जण बरे होऊन घरी गेले आहेत.  ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील सात जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, शहराला कालच रेडझोनमधून वगळले असून बाजारपेठ, दुकाने सुरू केली आहेत. कालपासून तर रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल एकाचदिवशी 21 तर आज आत्तापर्यंत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.  त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले.

बघता बघता कोरोनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घातला. दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत.  10 मार्च ते 23 मे या 75 दिवसात शहरातील 301 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सुरुवातीला सोसायटीत आढळलेला कोरोना आता मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्टीत शिरला आहे. शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आंनदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली असून 60 हून अधिक रुग्ण झोपडपट्टीत सापडले आहेत.

त्याचबरोबर शहराच्या नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढली आहे. त्यातच शहरातील निर्बंध शिथिल करत जनजीवन सुरू केले आहे. नागरिकांची बाहेर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

सध्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 112 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत बाधा झालेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. पण, ज्या प्रमाणात रुग्ण वाढताहेत, त्या प्रमाणात कमी सुद्धा होताहेत.

कोरोनाविरुद्ध लढण्या-या डाॅक्टर, नर्स, सेवक, पोलिस, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या लढ्याला यशही येत आहे. हीच जमेची बाजू मानली जात आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनावर मात करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like