Mumbai: वंदेभारत उपक्रमांतर्गत 3 हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

More than 3000 citizens in Maharashtra under Vandebharat mission from foreign

एमपीसी न्यूज- वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात 26 फ्लाईटसच्या माध्यमातून 3459 नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1137 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे.

दि.7 जून 2020 पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

तिथे गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.

आलेल्या नागरिकांचे कडक कॉरंटाईन होईल यावर प्रशासनाचे कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.

वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.