Pune : विसर्जन मिरवणुकीत देखील दिसला मोरे-टिळेकर संघर्ष; मर्सडीजच्या देखाव्याने वेधले लक्ष 

एमपीसी न्यूज – नगरसेवक वसंत मोरे यांना दहा कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस आमदार टिळेकर यांनी पाठवली पण त्याची फिकीर न करता मोरे हे भाजप विरोधात चांगलेच आक्रमक झाले असून गणेश विसर्जनाकरिता त्यांनी येवलेवाडी विकास आराखडामधील भ्रष्टाचार, आमदार टिळेकर यांची मर्सिडीज यावर देखावा बनवला असून भाजपच्या भ्रष्टाचाराचे विसर्जन करूया म्हणून आवाहन केले आहे. या निमित्ताने सेल्फी काढा असे सांगत येवलेवाडी विकास आराखड्यातील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगत भाजपला चांगलाच चिमटा काढला आहे.

वसंत मोरे यांनी यावर फेसबुकवर आवाहन केले होते की ‘एक तो सेल्फी बनता है यार !!  मी येवलेवाडी विकास आराखडा या बाबतीत जी पावले उचलतोय ती योग्य आहेत का जर तुमच्या नजरेत ती योग्य असतील तर मग उद्या सकाळी 11 वाजता किनारा हॉटेल कात्रज ते कात्रज गावठाण मार्गे कात्रज तलाव येथे माझ्या शूर शिवबा मित्र मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन 1 तरी सेल्फी काढून तुमच्या फेसबुकला पोस्ट करा की ती पोस्ट माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिली पाहिजे नक्की या मी वाट पाहत आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात हडपसर मतदारसंघातील विरोधी पक्षाबरोबर स्वपक्षीय सक्रिय झाले आहेत. सत्तेत असताना विकासकामे किती केली यापेक्षा आमदार पदाच्या काळात किती भ्रष्टाचार केला यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आमदार टिळेकर यांच्या अडचणीत भर पडली असून निवडून येणे दूर विधानसभेची उमेदवारी कट करण्यासाठी भाजपमधूनच हा भ्रष्टाचाराचा मालमसाला विरोधकांना पुरवला जात असून याला तोंड कसे द्यायचे या चिंतेत आमदार टिळेकर समर्थक पडले आहेत.

तर वसंत मोरे यांच्या गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून हा देखावा मात्र नागरिकांच्या चर्चेचा विषय झालेला असून आमदार टिळेकर आणि नगरसेवक मोरे यांच्यातील वाद काही मिटण्याची चिन्हे दिसत नसून अजून काय आरोप प्रत्यारोप होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.