Pimpri News : लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त; पायी चालणे, सायकलचा वापर करणे आवश्यक – आयुक्त राजेश पाटील

विना वाहन प्रवास धोरणाची अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – प्रचंड वेगाने वाढणा-या शहरीकरण व नागरीकरणामुळे हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाने ग्रस्त झालेलो आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनसंख्या लोकसंख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त झालेली दिसते. त्याचा परिणाम सर्वत्र वाहतूककोंडी, वायु प्रदूषणामुळे अनेक प्रश्न, समस्या नागरी भागात दिसतात. या समस्या कमी करण्यासाठी छोट्या, कमी अंतराच्या प्रवासासाठी पायी चालणे किंवा सायकलचा वापर करणे हे शहराच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने विना-वाहन प्रवास धोरणास सप्टेंबर 2021 च्या सभेत मान्यता दिली. त्याची अमंलबजावणी करण्यासाठी सर्व अभियंत्यांना व क्षेत्रीय अधिका-यांना हे धोरण अवगत करण्यासाठी नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा घेतली. त्यावेळी आयुक्त पाटील यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहरअभियंता मकरंद निकम, रामदास तांबे, सतीश इंगळे, अशोक भालकर, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, नगररचना उपसंचालक नाळे, महापालिकेतील सर्व अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना सलगपणे विनाअडथळा चालता येईल. असे उच्च दर्जाचे पदपथ, सायकल मार्ग सुरक्षितपणे वापरणे, तसेच शक्यतो नागरीक जवळच्या, कमी अंतराचा प्रवास नक्कीच पायी चालणे, सायकलीने करतील हा उद्देश ठेवून प्रशिक्षण घेतले. शाश्वत नागरी प्रवासासाठी बहु पर्यायी प्रवाशी साधनांचा उत्तम वापर कसा करता येईल. याबाबतच्या अनेक महत्वाच्या बाबीवर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. त्याचा यथोचित वापर अभियंते, निर्णय घेणा-या अधिका-यांनी करावा अशा सूचना दिल्या.

कोणत्याही शहरी रस्त्याचे डिझाईन हे रस्त्याचा प्रकार, त्याचा वापर, तो ज्या भागातून जातो. त्याच्या आजु-बाजूचा जमीन वापर आणि तेथील नागरिकांच्या गरजा व सहभाग नोंदवून तयार केले पाहिजे असे पांजली देशपांडे, संस्कृती मेनन, प्रसन्ना देसाई, विकास ठाकर यांनी सादरीकरणाद्वारे उदाहरणासह पटवून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.