Morwadi News: ‘पे-अँड पार्किंग’ रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यालयासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज – पे-अँड पार्किंग’ रद्द करण्याच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने आज (शनिवारी) सकाळी साडेअकरा वाजल्यापासून महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर ‘असहयोग’ आंदोलन करण्यात येत आहे.

पावसातही आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागणीची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हटणार नसल्याची भूमिका घेत आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. पण, आत्तापर्यंत सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष अथवा कोणत्याही पदाधिका-याने आंदोलकांची भेट घेतली नाही.

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, दीपक खैरनार, गणेश जगताप, राजश्री शिरवाळकर, सरस्वती सोनकांबळे, वैष्णवी ताकोडकर, शोभा चंदनशिवे आदी कार्यकर्ते आंदोनात सहभागी झाले आहेत. “रद्द करा, रद्द करा  पे-अँड पार्किंग’ रद्द करा”,  “पे-अँड पार्किंग’ पॉलिसी रद्द करा”, ”आमची मागणी मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

पे अँड पार्क’ सारखे जाचक धोरण राबविण्यापूर्वी जनतेच्या सूचना व हरकती मागवीने अपेक्षित होते, तसेच या धोरणाचा आराखडा नागरिकांपुढे ठेवला नाही. ‘पे अँड पार्क’ धोरण राबविताना भविष्यातील पार्किंग समस्येबाबत दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष गेले आहेत. यामुळे त्या घरातील माता-भगिनींना उदरनिर्वाहासाठी बाहेर पडावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ‘पे अँड पार्क’ च्या नावाखाली पैसा उकळणे कितपत योग्य आहे? ‘पे अँड पार्क’ धोरणाची अंमलबजावणी म्हणजे जनतेला विश्वासात न घेता, मनमानी पद्धतीने महसूल गोळा करून जवळच्या ठेकेदारांना पोसणे, तसेच यातून राजकीय नेत्यांच्या चेल्यांना व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना सेटल करून नवीन ” पार्किंग माफिया ” निर्माण करणे, हाच कुटील डाव दिसून येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोनाबाबत सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना निवेदन दिले होते. कार्यकर्ते सकाळपासून आंदोलन करत आहेत. पण, अद्यापही भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांने आंदोलकांची भेट घेतली नाही. त्यांचे म्हणणे जाणून घेतले  नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. भाजपचे पदाधिकारी किती असंवेदनशील आहेत हे यावरून दिसून येते असे भापकर म्हणाले. जोपर्यंत मागणीची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हटणार नसल्याची भूमिका घेत आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.