Morya Gosavi Festival : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोरया गोसावी महोत्सव साधेपणाने

1 जानेवारीपासून महोत्सवास प्रारंभ; अशोकराव गोडसे यांना जीवन गौरव पुरस्कार

सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने होणार नाहीत

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे . समाधी सोहळ्याचे हे 459 वे वर्ष असून शुक्रवार दि 1 ते सोमवार दि . 4 जानेवारी 2021  च्या दरम्यान साजरा होणा-या या महोत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना या वर्षीचा श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

दरवर्षी चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महानगर पालीका व ग्रामस्थांच्यावतीने संजीवनी समाधी सोहळा साजरा केला जातो. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सोहळ्या विषयीची बैठक चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार व ग्रामस्थांची नुकतीच संपन्न झाली.

यामध्ये कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव लक्षात घेता व राज्य शासनाच्या सुचनांचे पालन करण्यासाठी महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आहे. दरवर्षी दहा दिवस मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा हा उत्सव चार दिवसांचा होणार आहे.

यावर्षी उद्घाटन सोहळा,  सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान होणार नाहीत. कोरोना महामारीचा प्रभाव कमी होण्यासाठी देवस्थान मार्फत ‘महामृत्युंजय’ याग तीन दिवस केला जाणार आहे. 20 साधकांच्या उपस्थितीत दररोज श्री मोरया गोसावी चरित्र पठण होणार आहे. महोत्सवाला महापूजेने सुरुवात होईल तर काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार असल्याचे देव महाराज यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

1 ते 4 जानेवारी 2021 दरम्यान समाधी मंदिर आवारात मर्यादित लोकांमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महापूजेने महोत्सवाला सुरुवात होईल. शुक्रवार (दि.1) सकाळी सहा वाजता चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर आठ वाजता 20 साधकांच्या उपस्थितीमध्ये चरित्र पठण होणार आहे. सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वर मुरलीधर कपलाने महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. तो भरुन काढण्यासाठी देवस्थानतर्फे शनिवार (दि.2), रविवार (दि.3) दोन दिवस सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता नेत्र चिकित्सा शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप केले जाणार आहे. अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे यांनी याचे आयोजन केले आहे.

रविवार (दि.3) सायंकाळी पाच वाजता श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सोमवार (दि.4) पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा, अभिषेक मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी आठ वाजता मोरया गोसावी चरित्र पठण होईल.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश महाराज काळजे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. रात्री दहा वाजता समाधी मंदिर आणि मंगलमूर्ती वाड्यात धूपार्ती होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री मोरया गोसावी समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा येथे दरवर्षीप्रमाणे होणा-या महाप्रसादाचे वाटप यावर्षी होणार नाही.

राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन महोत्सव पार पडणार आहे. भाविकांनी नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंदार देव महाराज, विश्राम देव, आनंद तांबे, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.