Moshi : घरात पत्ते खेळू न दिल्याने तरुणाला फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज – घरात पत्ते खेळू न दिल्याने एकाने तरुणाला फावड्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या वडिलांना आणि एका शेजा-याला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 30) दुपारी चारच्या सुमारास मोशी येथे घडली.

आकाश गोपाळ नवघरे (वय 22, रा. सहयोग कॉलनी, साम्राज्य चौक शेजारी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा गायकवाड (वय 35, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा रविवारी दुपारी आकाश यांच्या घरात पत्ते खेळण्यासाठी आला. आकाश यांनी त्यांच्या घरात पत्ते खेळू दिले नाहीत. त्याबाबत आकाश आणि त्यांच्या वडिलांनी कृष्णाला समजावले. यावरून चिडलेल्या कृष्णाने आकाश यांच्या दोन्ही हातावर फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

हे भांडण सुरु असताना आकाश यांचे वडील गोपाळ नवघरे आणि त्यांचे शेजारी लक्ष्मण खंदारे मध्ये आले असता त्या दोघांना देखील कृष्णाने मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.