Moshi : एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला गृहनिर्माण सोसायट्यांचा तीव्र विरोध

कपात तत्काळ मागे घ्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अर्थहीन व चुकीची कारणे देत 25 नोव्हेंबरपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु करत शहरवासीयांवर पाणी कपात लादली आहे. पाणीकपातीमुळे शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने सोसायट्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे एकदिवसाआड पाणी पुरवठ्याला मोशीतील चिखली मोशी चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने तीव्र विरोध केला आहे. तसेच पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये फेडरेशनने म्हटले आहे की, एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सोसायट्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. महापालिका प्रशासन व सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कृपेने बिल्डरला पाणीपुरवठ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देताना अजब असे हमीपत्र बिल्डरकडून लिहून घेतले आहे.

कोणताही बिल्डर या हमीपत्रानुसार कोणत्याही सोसायट्यांना त्यांच्या खर्चाने पाणी पुरवत नाही. त्याबाबत महापालिकेकडे सातत्याने तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नाही. एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा घेतलेल्या निर्णयाला फेडरेशनचा प्रखर विरोध आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा आपल्या विरुद्ध खूप मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठा करताना दिलेली न पटणारी कारणे

समन्यायी पाणीपुरवठा होण्याबाबत – जे कारण सांगून पाणी कपात लादली. त्याला आठ दिवस झाले. तरीही, कुठेही समन्यायी पद्धतीने पाणी वाटप होत नाही. उलट पहिल्यापेक्षा 50% पाणी आमच्या सोसायट्यांना कमी मिळत आहे. पाणीपुरवठा विभाग व अधिकारी निष्क्रिय आहेत. सोसायट्यांना पहिल्यापेक्षा 50% पाणी कमी मिळत आहे. सोसाट्यांनी पाण्याची साठवणूक करण्यासाठी 15 दिवसात टाक्या बांधून घेण्याबाबत आपण केलेले आवाहन हास्यास्पद आहे. 15 दिवसात सोसायटीमधे नवीन टाक्या बांधण्यासाठी जागा कुठे आहे? त्यासाठी पूर्वीचा बांधकाम प्लॅन रिवाईज करण्यासाठी महापालिकेडे मंजुरीसाठी द्यावा लागेल, तो कोणी द्यायचा ?

या सर्व परवानग्या घेऊन 15 दिवसात पाण्याची नवीन टाकी बांधून होईल का ? हे सर्व 15 दिवसात होईल असे आपल्याला वाटते का ? का प्लॅन रिवाईज न करता अनाधिकृतपणे टाक्या बांधायच्या का ? हे अनाधिकृतपणे केलेले काम आपल्याला मान्य आहे का ? आपण बिल्डरला बांधकाम प्रोजेक्ट परवानगी देताना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना बिल्डरने सोसायटी धारकांना पाणी पुरेल एवढी पाण्याची टाकी बांधली आहे का ? याची तपासणी करूनच हे दाखले दिले असतील ना ? मग आता या टाक्या बांधण्याचे आदेश आपण बिल्डरला देणार का?

बांधकाम व्यावसायिक यांना त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना बिल्डरनी सोसायटी धारकांना स्वखर्चाने पाणी पुरवण्याचे हमीपत्र बिल्डरकडून महापालिकेने लिहून घेतले का?, सर्वच राजकीय पक्ष व सर्वच राजकीय नेते आणि महापालिका प्रशासन यांनी संगनमताने बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी त्यांचा बांधकाम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना जो पर्यंत भामा आसखेडचा टप्पा 5 व 6 पूर्ण होऊन पाणी येत नाही. महापालिकेकडून सोसायटी धारकांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवत नाही. तोपर्यंत सर्व बिल्डरने सोसायटी धारकांना स्वखर्चाने पाणी पुरवावे असे हमीपत्र लिहून घेऊन महापालिकेने बिल्डरला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे.

या हमीपत्रानुसार कोणतीही बिल्डर पाणी पुरवत नाही. सर्व बिल्डरनी या अटींचे उल्लंघन केलेले आहे. याबाबत वेळोवेळी आपल्याला लेखी देऊन , तसेच आपल्या 21 जुलै 2019 रोजीच्या फेडरेशनच्या सोसायटी धारकांच्या समस्याबाबत सोसायटी धारकांशी संवाद या कार्यक्रमामध्ये हे आपल्या निदर्शनास आणून देऊन देखील बिल्डर विरुद्ध काहीही कार्यवाही केलेली नाही.

या सर्व बिल्डरवर कार्यवाही करून सर्व बिल्डरला त्यांच्या स्वखर्चाने पाणी पुरवण्याचे व आजपर्यंतचे मागील सर्व पाण्यासाठी टँकरवर खर्च झालेले पैसे सोसायटी धारकास देण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा या सर्व बांधकाम व्यावसायिक यांचा बांधकाम परवाना रद्द करावा, त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.