Moshi: क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ; बाहेर पडण्याचा प्रयत्न

Citizens rioted at the quarantine center ; Trying to get out

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासन सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत आज, मंगळवारी गोंधळ घातला. यावेळी नागरिक क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.

पिंपरी -चिंचवड महापालिकेने मोशी परिसरात क्वारंटाईन सेंटर उभारले असून तिथे कोरोना संशयितांना ठेवले जाते. एकूण 210 नागरिक त्या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलेले आहेत.

मात्र, तेथील नागरिकांचे अहवाल हे उशिरा येत असून जेवण आणि इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आज , मंगळवारी सकाळी येथील नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गोंधळ करत सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत.

दोन दिवसांपूर्वी देखील या क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी असाच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महापालिका अधिका-यांनी समजावूनत्यांना पुन्हा गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले.

मात्र, गैरसोय होत असल्याने आज पुन्हा अनेकांनी बाहेर पडण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे सोशल
डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

याबाबत बोलताना सहायक आयुक्त प्रशांत जोशी म्हणाले, ”क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना नाष्टा, जेवण, चहा वेळेवर दिला जात आहे. अहवाल येण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आहे. बाहेरील अनेक जण आत येतात. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याच्या सुचना दिल्या आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.