Moshi : प्राधिकरणासंदर्भातील समस्या निराकरणासाठी उद्या मोशीत परिसंवाद

आमदार महेश लांडगे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सीईओ प्रमोद यादव यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणमधील रहिवाशी, व्यापारी, औद्योगिक भूखंडधारकांच्या समस्या निराकरणासाठी मोशी प्राधिकरण नागरी कृती समिती, मोशी प्राधिकरण विकास फेडरेशन यांच्या वतीने उद्या (शनिवारी) प्राधिकरणाचे अध्यक्ष, सीईओ यांच्याशी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मोशी, प्राधिकरण संतनगर येथील हृदय हॉलमध्ये शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित राहणार आहेत.

प्राधिकरणातील भूखंड, सदनिका त्रयस्थ व्यक्तीच्या नावे हस्तांतरण करण्याची कार्यपद्धती, वारसाचे नाव मिळकतीस लावणे, प्राधिकरणाकडून भूखंड, सदनिका धारकास भूखंडाचा ताबा देण्यासाठीची कार्यपद्धती, प्राधिकरण जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणेबाबत, भाडेपट्टा झाल्यापासून किती दिवसात प्राधिकरणाच्या मिळकतीचे हस्तांतरण करण्यात येते.

प्राधिकरणाने राबविलेल्या गृहयोजनेमधील सदनिका मूळ मालकाकडून त्रयस्थ व्यक्तीने खरेदी केल्यास मालकी हक्क मिळविण्याची कार्यपद्धती, मिळकत हस्तांतरण संदर्भातील शंका व अडचणी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणेबाबत, आरक्षित जागांवरील विकास याबाबत परिसंवादात चर्चा केली जाणार आहे. त्याची माहिती दिली जाणार आहे.

त्याचबरोबर प्राधिकरणाने काही वर्षापूर्वी राबविलेल्या गृहयोजना पुर्नविकास धोरण, सोसायटीतील कचरा विल्हेवाट प्रक्रिया जागा उपलब्धतेचे धोरण, प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छा व आरोग्य समस्याबाबत, नागरी क्षेत्रावर प्रस्तावित गृहयोजनेस नागरिकांच्या विरोधाबाबत भूमिका यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

सोसायटीतील चेअरमन, सेक्रेटरी यांनी आपल्या प्रश्नांचे निवेदन घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.