Moshi Crime : वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमन करत असताना वाहतूक पोलिसाने एका ट्रक चालकाला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर भारत माता चौक, मोशी येथे घडली.

पोलीस शिपाई शंकर हिरामण रोकडे (वय 35) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक राहुल अशोक दातीर याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर रोकडे हे रविवारी रात्री सात वाजताच्या सुमारास मोशी येथील भारत माता चौकात वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी चौकात एम एच 42 / बी 8456 हा आयशर ट्रक आला. रोकडे यांनी ट्रक चालक राहुल दातीर याला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. राहुल याने वाहतूक पोलीस रोकडे यांच्याकडे रागाने पाहत ट्रक त्यांच्या अंगावर चालवत रोकडे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर ट्रक चालक चौकातून पुढे निघून गेला. रोकडे यांनी दुचाकीवरून ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला ओव्हरटेक करत असताना आरोपी राहुल याने खोडसाळपणे रोकडे यांच्या दुचाकीला डाव्या बाजूला दाबून त्यांना पुढे जाऊ न देता पुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत ट्रक चालक राहुल याच्यावर खुनाचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.